अलीकडच्या काळात खेकड्यांना मोठी मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढा खेकड्यांचा पुरवठा नसल्याचं अनेकदा पहायला मिळतं. खेकडा म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. याला कारण म्हणजे, त्याचा असणारा आकार, त्याचा येणारा वास. त्यामुळे अनेक जणांना खेकडा हा फक्त बघायला आवडतो. मात्र, येत्या काही दिवसात खेकडा खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे खेकड्याची मागणी देखील वाढू लागली आहे. पण, तुम्हाला हे माहीत आहे का की खेकड्याची सुद्धा शेती केली जाते. दौंड तालुक्यातील बाप लेकाने असाच खेकड्यांच्या शेतीचा भन्नाट प्रयोग केला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आहे. खेकड्याच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे.

बाप लेकाचा खेकड्यांच्या शेतीचा भन्नाट प्रयोग

दौंड तालुक्यातील यवत येथील पिता-पुत्र राजेंद्र ननावरे व कुलदीप ननावरे यांनी शेतात खेकड्याची शेती सुरू केली आहे. बाजाराचा अभ्यास करून भरघोस नफा कमावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खेकडे पकडणे ही एक कला आहे पण त्याचबरोबर त्यासाठी खूप मेहनत आणि धाडसही लागते. त्यामुळे काही खास लोकच खेकडे पकडताना दिसतात. मात्र, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत खेकड्यांचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात होत नाही. याचा विचार करून ननावरे बाप लेकानी खेकड्याच्या शेतीचा अभ्यास करून हा प्रयोग केला आहे.

खेकड्यांच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणार

दौंड तालुका तसा गुळाच्या गुऱ्हाळ यांनी प्रसिद्ध आहे. मात्र सद्या राबवला जात असलेला खेकड्यांच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे. कारण, हा शेतीचा प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत. त्यांना ननावरे हे योग्य मार्गदर्शन करत असतात. शेतीला जोड धंदा म्हणून खेकड्यांची शेती हा उत्तम पर्याय असल्याचे ते सर्वांना सांगतात. तरुणांनी खेकड्याची शेती करावी, त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय, छोटे मोठे शेतकरी देखील हा व्यवसाय करु शकतात. ननावरे कुटुंबाने आधुनिक शेतीच्या दृष्टीने एक पाऊले पुढे टाकले आहे.

कशी केली जाते खेकड्याची शेती?

शेतात ४० फूट रुंद व ५० फूट लांब व ११ फूट खोल हौद तयार करण्यात आला. वाळूचे खडे, मोठे डबर, चिकणमाती, बारीक वाळू, योग्य प्रमाणात आणि योग्य मांडणीने भर घातली. त्यात पाणी साठवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे खेकड्यांना योग्य अधिवास निर्माण झाला. यामध्ये टप्प्याटप्प्याने सुमारे एक टन खेकडे सोडण्यात आले. इंदापूर, भिगवण, भोर, खडकवासला अशा विविध ठिकाणांहून हे खेकडे आणण्यात आले आहे. या सर्व खेकड्यांची अंदाजे संख्या पाच ते सहा हजार आहे.

नियोजन करुन खेकडे वाढवल्यास आर्थिक फायदा नक्कीच होणार

खेकड्यांना खाण्यासाठी आठवडी बाजारातील टाकाऊ भाजीपाला, हॉटेलचा कचरा, शिजवलेला भात, चिकन सेंटरमधून कोंबड्यांचे अवशेष माफक प्रमाणात दिले जातात. ननवरे यांनी हे खेकडे कमी किमतीत खरेदी केले आहेत. त्यांची योग्य पद्धतीने जोपासना केली जात आहे. दिवाळीनंतर मांसाहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. या काळात पूर्ण वाढ झालेले खेकडे विक्रीसाठी काढले जाणार आहेत. थोडी मेहनत आणि योग्य नियोजन करून खेकडे वाढवल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दौंड तालुक्यात पहिलाच प्रयोग

दौंड तालुक्यात पारंपरिक गुऱ्हाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर याच ननावरे बाप लेकाने उत्तर भारतीय गुऱ्हाळाचा दौंड तालुक्यात पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर दौंड तालुक्यात गुऱ्हालाच्या नावाने ओळखला जाऊ लागला. आता पुन्हा एकदा ननावरे यांनी खेकडा शेतीचा नवा प्रयोग सुरू केला आहे. भविष्यात अनेकांना याचा फायदा होईल. त्यामुळे पुन्हा दौंड तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल,असा विश्वास ननावरे यांनी व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here