पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचं संगारेड्डीचं आहे. मात्र सात वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी संपूर्ण कुटुंब हैदराबादला आलं. सुजाथा घरातच टेलर म्हणून काम करायच्या. तर नागाराजू एका किराणा दुकानात काम करायचे. सुजाथा आणि दोन मुलांची हत्या करून नागाराजूनं आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घर आतून बंद होतं. त्यामुळे कोणीतरी बाहेरुन आत गेल्याची शक्यता नाही. नागाराजूनं तिघांना संपवून मग गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. नागाराजू आणि सुजाथा यांच्यात वारंवार वाद व्हायचे, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. सुजाथाचे आधी प्रेमसंबंध होते. यावरून नागाराजू तिला त्रास द्यायचा. तिचा छळ करायचा.
सुजाथा टेलरिंगसाठी वापरत असलेल्या कात्रीचा वापर नागाराजूनं तिला आणि दोन मुलांना संपवण्यासाठी केला. यामुळे त्या तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली कात्री ताब्यात घेतली. तिन्ही मृतदेह सुजाथा यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.