दिवाळीच्या तोंडावर आयुक्तांनी हे पत्रक काढल्याने वर्षानुवर्षे दिवाळीच्या तोंडावर आपली खासगी वाहने दिवाळी भेटीने भरुन नेणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. बांधकाम, नगररचना, आयुक्त कार्यालय ही भेटीची आणि वर्दळीची ठिकाणे असायची. कोणीही व्यक्ती भेटवस्तू घेऊन पालिकेत येत असेल तर सुरक्षा विभागाने त्यांना प्रवेशव्दारावर रोखून धरावे. त्यांना कार्यालयात मज्जाव करावा, असे आदेश आयुक्तांनी सुरक्षा विभागाला दिले आहेत.
दिवाळी सण सुरू झाल्यानंतर वर्षानुवर्षे पालिकेशी संबंधित ठेकेदार, विकासक, वास्तुविशारद, हितचिंतक पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या दिवसात विविध प्रकारच्या भेट वस्तू देतात. यामुळे पालिका कर्मचारी, अधिकारी आपल्या कर्तव्यापासून विचलित होऊ शकतो. हा विचार करुन आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना आपल्या लोकाभिमुख कर्तव्याची जाणीव या पत्रातून करून दिली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचा कारभार लोकाभिमुख, प्रभावीपणे राबविण्यासाठी पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. कामातील पारदर्शकपणा, सातत्य कायम ठेवण्यासाठी कोणाही पालिका अधिकारी, कर्मचाऱ्याने कोणत्याही व्यक्तींकडून दिवाळी भेट वस्तू स्वीकारू नये. अशाप्रकारची भेट वस्तू कर्मचारी, अधिकाऱ्याने स्वतः , आपले कुटुंबीय किंवा खासगी व्यक्तींमार्फत स्वीकारण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील कलम १२ नुसार कारवाई केली जाईल. तसेच संबंधिता विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिला आहे.