म. टा. प्रतिनिधी, सांगली: ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांकडून मोबाईल मिळत नसल्याने दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन केली हा प्रकार जत तालुक्यातील मल्लाळ येथे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा घडला. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १५, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मंगळवारी (ता. १४) जत पोलिस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारुती हराळे यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श हराळे हा इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण होऊन दहावीत गेला होता. जत शहरातील जत हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळेने ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. शाळेतील शिक्षकांसह खाजगी शिकवण्यांचे शिक्षकही शिक्षणाचे ऑनलाइन धडे देत आहेत. आदर्श हराळे याने वडिलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइलचा आग्रह केला होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तातडीने नवीन मोबाइल घेणे शक्य नसल्याने वडील आप्पासाहेब यांनी आदर्शला सा़गितले. आदर्शने वेळोवेळी मोबाइलची मागणी केल्यानंतर वडील त्याची समजूत काढून वेळ मारून नेत होते.

सोमवारी आदर्शने पुन्हा वडिलांकडे मोबाइलसाठी आग्रह केला. मात्र सध्या मोबाइल मिळणार नसल्याचे वडिलांनी सांगितले. मोबाइल मिळत नसल्याने निराश झालेल्या आदर्शने सायंकाळी घरी कोणी नसल्याचे पाहून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला. वडिलांनी तातडीने त्याला उपचारासाठी जत मधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

आदर्शच्या पश्चात आई वडील व लहान भाऊ आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल मिळत नसल्यामुळे आदर्शने आत्महत्या केल्याचे समजताच गावातील लोकांना धक्का बसला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला असला तरी, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाइल उपलब्ध नसणे, इंटरनेटची रेंज नसल्याने विद्यार्थ्यांमधील तणाव वाढत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here