गद्दारी केलेल्या आणखी एका आमदारानं तर पोह्यांवर हात ठेवला होता. मी अन्नाची शप्पथ घेऊन सांगतो, असं त्यांना म्हटलं होतं. मात्र तेदेखील गेले. झालं ते चांगलंच झालं, असं मी मानतो. कारण अशी माणसं पक्षात नको. शिवसेना सोडून गेलेल्या माणसांचं काय झालं ते आपण पाहिलं आहे. या सगळ्या ४० जणांनी खोके घेतले आहेत. त्यामुळे आता त्यांचा व्हीआरएस नक्की आहे. त्यांना त्यांचे मतदारसंघ सोडावे लागतील, असं भाकीत आदित्य यांनी वर्तवलं.
उद्धव ठाकरे भेटत नाहीत, अशी या आमदारांची तक्रार होती. कोणावर तरी खापर फोडायचं म्हणून ही टीका होते. वर्षाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तरी या टीकेतील फोलपणा लक्षात येईल, असं आदित्य म्हणाले. सोडून जाणाऱ्यांना कोणावर तरी टीका करावी लागते. माझ्यावरही टीका होते. त्याचा आनंदच आहे. कारण फुटबॉलमध्येही प्रतिस्पर्धी संघ मेस्सी, रोनाल्डोसाठी मॅन टू मॅन मार्किंग करतो. मात्र या सगळ्यात एका गोष्टीचं वाईट वाटतं. ज्या लोकांना आपण सगळं काही दिलं. सत्तेत असताना, सत्तेत नसताना कायम पाठिशी राहिलो. ते निवडून यावेत यासाठी सभा घेतल्या. उन्हापावसात फिरलो. त्यांनी अशा प्रकारे विश्वासघात केला याचं दु:ख वाटतं, असं सांगताना आदित्य यांचा आवाज काहीसा कापरा झाला होता.
तब्बल चाळीस आमदार शिंदेंसोबत गेले. काही जण तर तुम्हाला, उद्धव ठाकरेंना भेटून एकनिष्ठतेच्या आणाभाका घेऊन निघून गेले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही, या प्रश्नालाही आदित्य यांनी उत्तर दिलं. माणूस एकदा विकला गेला की अशा गोष्टींनी काही फरक पडत नसतो. अनेक जण आम्हाला भेटून तिथे गेले. त्यावेळी मी उद्धवजींशी बोललो होतो. त्यावेळी जे विकले गेले आहेत, त्यांना जाऊ देत. त्यांना थांबवून काही अर्थ नाही, अशा स्वरुपाचं उत्तर उद्धव यांनी दिलं होतं, असं आदित्य यांनी सांगितलं.
आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तेव्हा आम्हाला सातत्यानं सांगितलं जायचं त्या दोन्ही पक्षांकडे लक्ष ठेवा. ते कधीही पाठीत खंजीर खुपसतील. मात्र प्रत्यक्षात आमच्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्यावर आम्ही पूर्ण विश्वास टाकला, हीच आमची चूक झाली. त्यांनी अश्रू ढाळले. पक्षासोबत असं कधीच करणार नाही. तसा विचारही मनात येणार नाही, असं ते आम्हाला सांगत होते. आम्ही त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, ही आमची चूक होती, अशी कबुली आदित्य यांनी दिली.