दरम्यान सात जखमींपैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सहा कामगार ठेकेदाराचे आहेत तर एक ट्रेनी इंजीनिअर आरसीएफचा असल्याचाही माहिती मिळाली आहे. मात्र मृत्यूंबाबत कंपनी कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान रात्री उशिरा आरसीएफकडून याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या थळ कारखान्यातील बाष्पनिर्मिती संयंत्रामधील नियंत्रण कक्षाच्या एसी सप्लाय आणि इंस्टॉलेशनच्या कामाचा ठेका मेसर्स एरीझो ग्लोबल या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. या ठेकेदार कंपनीचे कर्मचारी नवीन एसी युनिटचे इंस्टॉलेशनचे काम करीत असताना स्फोट झाला. या स्फोटात ठेकेदार कंपनीचे पाच आणि आरसीएफचा एक कर्मचारी जखमी झाले. जखमींना त्वरित आरसीएफ हॉस्पिटल कुरुळ वसाहत येथे हलविण्यात आले.
फैजन शेख (वय ३२ वर्षे), दिलशाद इदरिसी (वय २९ वर्षे) हे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी तर अंकित शर्मा (वय २७ वर्षे) हे आरसीएफ प्रशिक्षणार्थी यांना मृत घोषित करण्यात आले. तर साजिद सिद्दिकी, जितेंद्र शेळके आणि अतींदर या ठेकेदार कंपनीचे कर्मचार्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. स्फोटाचे निश्चित कारण समजू शकले नाही. या संदर्भात चौकशी सुरू आहे. ही माहिती आरसीएफच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने दिली आहे.