राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू केल्यानंतर मुंबई महापालिकेनेही लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय अर्थात राणीबाग पुन्हा खुले करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दररोज ५० टक्के पर्यटक प्रवेश, सामाजिक वावराचे पालन आणि आवश्यक खबरदारीच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला असून, सरकारने परवानगी दिल्यास राणीबाग पर्यटकांसाठी खुले केले जाणार आहे.
मुंबईकरांसह देश-विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी राणीबागेला भेट देत असतात. वाघ, हत्ती, जिराफ, पाणघोड्यासह हजारो प्राणी, पक्षी आणि सुमारे साडेतीन हजारांहून अधिक दुर्मिळ वनसंपदा हे राणीबागचे आकर्षण आहे. करोना लॉकडाउनमुळे मार्चपासून राणीबाग बंद आहे. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत उद्यान सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राणीबाग सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश दिला जाईल. सामाजिक वावराचे नियम पाळले जातील. प्राण्यांपासून अंतर ठेवण्यासाठी प्रेक्षक गॅलरीपासून एक मीटर अंतर ठेवले जाईल. तिकीट खिडकीजवळही सुरक्षित अंतर ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. दर दोन तासांनी सॅनिटायझेशन करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
राणीबागेत मार्च २०१७ मध्ये पेंग्विन आणण्यात आले. त्यामुळे दररोज पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली आहे. दररोज सुमारे पाच हजार, तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी १० ते १५ हजारांपर्यंत पर्यटक येत आहेत. याआधी दररोज १५ ते २० हजारांपर्यंत मिळणारे उत्पन्न एक लाखांपासून सहा लाखांपर्यंत वाढले आहे.
…
दररोज दीड लाखाचे नुकसान
मागील दोन वर्षांत राणीबागचे सरासरी उत्पन्न मासिक ४५ लाखांवर गेले आहे. लॉकडाउनमुळे राणीबाग पर्यटकांसाठी बंद असल्याने दररोज दीड लाखांचा महसूल बुडत आहे.
…
अशी केली तयारी
– प्रवेशद्वाराजवळची गर्दी टाळणार
– उद्यानात गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के पर्यटकांना प्रवेश
– सामाजिक वावर नियमांचे कठोर पालन
– प्राण्यांपासून प्रेक्षक गॅलरीपासून एक मीटर अंतर, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतर
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times