जालना : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्येही गुरुवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस कोसळला. त्यामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले, तसंच शेतजमिनींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. परिणामी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दोन वर्ष करोना महामारीच्या संकटातून शेतकरी आता कुठे सावरत असताना पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढावले आहे.

दिवाळी सण जवळ आल्याने बहुतांश शेतकरी शेतातील धान्य विकून त्यातून आलेल्या पैशांमधून दिवाळीसाठी खरेदी करत असतात. मात्र यावर्षी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा दिवाळी कडू होणार आहे. जाफराबाद तालुक्यात सद्यस्थितीत सोयाबीन आणि मका पीक काढणीची वेळ आहे. त्यात जोरदार पावसाने पिके पाण्याखाली जाऊन खराब होत आहेत. आता सोयाबीनची पिके हातातून गेल्यात जमा असून कापूस पिकाची सुद्धा तीच अवस्था काल रात्री झालेल्या पावसामुळे झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात १८ हजार कोटीचे प्रकल्प, कोणते आणि कुठे आहेत? पाहा…

कुंभारझरीसह कालेगाव, खानापूर, काचनेरा, नांदखेडा, किन्ही, डोलखेडा, सावरगांव आदी गावात अवकाळी पावसाने हाहा:कार उडवला आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यात येत आहे. मात्र पिकावर इतका खर्च करून अंतिम टप्प्यात पावसामुळे होत्याचं नव्हतं झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here