मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अडचणीत आल्या आहेत. बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवडी कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. या सुनावणीवर शिवडी कोर्टाने बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश मुलुंड पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता नवनीत राणा यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक राखीव कोट्यातून लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बोगस कागदपत्र तयार करुन अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणात नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रकरण न्यायालयात आहे. मात्र, आता शिवडी कोर्टाने नवनीत राणा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवडी कोर्टाच्या आदेशानंतर नवनीत राणा यांनी तातडीने सत्र न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आव्हान दिले आहे. मात्र सत्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे शिवडी कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास नवनीत राणा यांना अटक होऊ शकते.

या प्रकरणातील तक्रारदार जयंत वंजारी यांच्या वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्र न्यायालयाने शिवडी कोर्टाच्या अजामीपात्र अटक वॉरंटला स्थगिती दिलेली नाही. मग तरीही पोलीस न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी का करत नाहीत, असा सवाल जयंत वंजारी यांच्या वकिलांनी उपस्थित केला. याप्रकरणात आता शिवडी कोर्टात पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत पोलीस नवनीत राणा यांच्यावर काही कारवाई करतात का, हे पाहावे लागेल.

Navneet Rana: नवनीत राणांनी गणपतीची मूर्ती तलावात फेकली, सुषमा अंधारे संतापून म्हणाल्या….

नेमकं प्रकरण काय?

नवनीत राणा यांनी खोट्या दाखल्याच्या आधारावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. नवनीत राणा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. आपण अनुसूचित जातीतीत असल्याचा दावा नवनीत राणा यांचा आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने मागच्या वर्षी जून महिन्यात राणा यांचे जातप्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. राणा यांना दोन लाखांचा दंडही उच्च न्यायालयाने सुनावला होता. मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली होती. दरम्यान, नवनीत राणा यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यानंतर जून २०२१ मध्ये सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो. न्यायालयाच्या आदेशाचे पालन मी नेहमी करत आली आहे.जात वैधता प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे. यातच माध्यमावर ज्या पद्धतीने बातम्या प्रसारित होत आहे. त्या सर्व निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here