पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर स्थिर ठेवले होते. तर सोमवारी डिझेलमध्ये ११ पैशांची वाढ केली होती. आज पुन्हा कंपन्यांनी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ८७.१९ रुपये कायम असून डिझेलचा भाव ७९.४० रुपयांवर गेला आहे. दिल्लीत डिझेलने ऐतिहासिक स्तर गाठला आहे. डिझेलचा भाव ८१.१८ रुपये असून पेट्रोल ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.१० रुपये असून डिझेल ७६.३३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ८३.६३ रुपये असून डिझेल दर ७८.२२ रुपयांवर कायम आहे.
दरम्यान, विदेशी चलन बाजारात भारतीय रुपया २३ पैशांनी घसरला. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेन्ट क्रूडचा दर ०.७३ टक्के खाली येत प्रति बॅरल ४२.४१ डॉलर झाला. देशात टप्प्याटप्याने अनलॉक-१ची प्रक्रिया सुरु आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील, आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूचा १६.२९ दशलक्ष टन खप झाला. मे महिन्याच्या तुलनेत त्यात ११ टक्के वाढ झाली. मात्र गेल्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत अजूनही इंधन विक्री ७.९ टक्के कमीच आहे. पण इंधन विक्री आता हळूहळू लॉकडाउनपूर्व पदावर येत असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त आहेत. २०१० मध्ये सरकारने पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तर २०१४ मध्ये डिझेल दर नियंत्रणमुक्त करण्यात आले. देशात इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. दररोज सकाळी इंधन दर आढावा घेतला जातो. १६ मार्चपासून पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. यात झालेलं नसून भरून काढण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी मागील महिनाभर पेट्रोल आणि डिझेल दर वाढवले. गेल्या महिन्याभरात २१ वेळा पेट्रोल आणि २३ वेळा डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times