कोलंबो: सोशल मीडियावर माकडाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ श्रीलंकेतील आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले. व्हिडीओमध्ये एक माकड एका व्यक्तीच्या पार्थिवाजवळ बसलेलं दिसत आहे. मृत व्यक्तीनं माकडाची काळजी घेतली होती. तो त्याला खाऊ पिऊ घालायचा. आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनामुळे माकडाला दु:ख झालं. तो त्याच्या शेजारीच बसून होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होता.

माकडाचा व्हिडीओ अतिशय हृदयस्पर्शी आहे. तो पाहून अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. श्रीलंकेतील बट्टीकोलओआमध्ये राहणाऱ्या पितांबरम राजन नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. बऱ्याच कालावधीपासून ते आजारी होते. वयाच्या ५६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक जमले. त्यांचं पार्थिव घराबाहेर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.

नातेवाईक, मित्र परिवार राजन यांना श्रद्धांजली देत असताना एक माकड त्यांच्या मृतदेहाजवळ येऊन बसलं. त्यामुळे राजन यांच्या नातेवाईकांना आश्चर्याचा धक्काच बसला. राजन दररोज या माकडाला खायला द्यायचे. त्याची काळजी घ्यायचे. त्यामुळे राजन आणि माकडाची मैत्री झाली. त्यांच्यात एक नातं निर्माण झालं. त्याच जिव्हाळ्यापोटी माकड राजन यांच्या मृतदेहाशेजारी बसलं. ते तिथून हलतच नव्हतं.
भयंकर! दलित तरुणाला मारहाण; अर्धी मिशी कापली; तोंडाला काळं फासलं, बाजारात फिरवलं
राजन यांचा श्वास सुरू आहे का ते माकडानं तपासून पाहिलं. आपला कान त्यांच्या छातीला लावला. माकडानं राजन यांना जीव लावला होता. माकडाचं प्रेम पाहून तिथे उपस्थित असलेले सारेच गहिवरले. आपली काळजी घेणारा माणूस आपल्याला सोडून निघून गेलाय याची कल्पना माकडाला आली. माकड एकटक राजन यांच्या निष्प्राण देहाकडे पाहत होतं. त्यांच्या चेहऱ्यावर अलगद हात फिरवत होतं. राजन आणि माकड यांचं हे नातं पाहून तिथले सारेच हेलावून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here