मुंबई: बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरुन चारकोप पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजय गुप्ता नावाच्या तरुणानं सप्टेंबर २०२१ मध्ये ३० हजार अंड्यांची ऑर्डर दिली होती. त्याला घाऊक विक्रेता म्हणून व्यवसाय सुरू करायचा होता. ऑर्डर दिल्यावर त्यानं ४४ हजार २०० रुपये इतकी रक्कम ऍडव्हान्स म्हणून भरली. यामध्ये १० हजार २०० रुपये जीएसटीचे होते. यानंतर समोरील व्यक्तीनं ४२ हजार ७५० रुपये विमा म्हणून मागितले. ते भरण्यास गुप्तानं नकार दिला. त्यानं आधी भरलेली रक्कम परत मागितली. मात्र समोरील व्यक्तीनं पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवली.

बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या गुप्ताला अंड्यांचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यानं जस्ट डायलवरून गुरमीत सिंगशी संपर्क साधला. गुप्तानं ३० हजार अंड्यांची ऑर्डर दिली. त्यासाठी ४० टक्के रक्कम भरली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यानं चारकोप पोलीस ठाणं गाठलं. पण तेव्हा कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यानं तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे गुप्ता मे २०२२ मध्ये न्यायालयात गेला. न्यायालयानं पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला.
VIDEO: भयंकर! डेंग्यूच्या रुग्णांना प्लाझ्माच्या जागी मोसंबीचा ज्युस चढवला अन् मग…
गुप्ताचे वडील चारकोपमध्ये फळांचा स्टॉल लावतात. गुप्ताला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. अंड्यांची घाऊक विक्री करण्याचा निर्णय त्यानं २०२१ मध्ये घेतला. जस्ट डायलवर त्याला पॅराडाईज एक्स्पोर्ट कंपनीची माहिती दिसली. तिथे गुप्तानं स्वत:ची माहिती नोंदवली. अवघ्या काही मिनिटांत त्याला गुरमीत सिंगचा फोन आला. ३० अंड्यांच्या एका ट्रेसाठी ९५ रुपयांचा दर असल्याचं त्यानं सांगितलं. त्यावर गुप्तानं १००० ट्रे हवेत असल्याचं सांगितलं. ९५ रुपयांऐवजी ८५ रुपयांना ट्रे दे, असं सिंग म्हणाला. दोघांमध्ये व्यवहार ठरला.

सिंगनं गुप्ताला ४० टक्के रक्कम भरण्यास सांगितली. उर्वरित रक्कम अंडी मिळाल्यानंतर भरायची होती. सिंगवर विश्वास ठेऊन गुप्तानं ३४ हजार भरले. अंडी कधी मिळणार याबद्दल त्यानं विचारणा केली. त्यासाठी आधी जीएसटी भरावा लागेल, असं सिंगनं सांगितलं. यानंतर गुप्तानं सिंगला जीएसटीची रक्कम पाठवली. त्याच रात्री गुप्ताला व्हॉट्स ऍपवर एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. सिंगला आणखी पैसे देऊ नकोस. तो फसवणूक करतो. त्यानं याच पद्धतीनं अनेकांना गंडा घातल्याचं कॉल केलेल्या व्यक्तीनं गुप्ताला सांगितलं.
निकितापासून लांब राहा! इन्स्टा स्टोरीवरून वाद, एक्सची तरुणाला जबर मारहाण, कानाचा पडदा फाटला
दुसऱ्या दिवशी गुप्तानं सिंगला कॉल करुन याबद्दल सांगितलं. त्यावर कॉल करणारा खोटारडा असल्याचं सिंग म्हणाला. सिंगनं आणखी ४२ हजार ७५० रुपये मागितले. ते भरण्यास गुप्तानं नकार दिला. त्यानं आधी भरलेले पैसे परत मागितले. ते देण्यास सिंगनं असमर्थता दर्शवली. त्यानंतर गुप्तानं पोलीस ठाणं गाठलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here