नेमकं काय घडलं?
घंटाळे परिसरात पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला आहे. दोन गटांमधील संपत्तीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घंटाळी मंदिर परिसरातील ओम साई रियल इस्टेट एजंटच्या कार्यालयावर हा गोळीबार झाला. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या कार्यालयात ते रात्रीच्या वेळी कंदील पुरवण्याचं आणि कार्यालयाची सजावट करण्याचे काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी ३ गोळ्या झाडल्या असून या घटनेत सूर्यवंशी नामक एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
येऊर परिसरात गोळीबार
ठाण्यात वर्तकनगर परिसरातल्या येऊर जंगलात गण्या काळ्या नावाच्या गुंडावर गोळीबार करण्यात आला आहे. गँगवॉरमुळे हा गोळीबार झाला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर गोळीबार केल्यानंतर अज्ञात व्यक्ती पळून गेले. यामध्ये गुंड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.