पुणे : ‘पुण्याच्या वाहन उद्योगातील प्रमुख कंपन्या मध्य प्रदेशात येण्यास उत्सुक असून, त्यांनी ई वाहनांच्या क्षेत्रात स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी तीनशे एकर क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले आहे. या उद्योगांना मुंबई-पुण्यापेक्षा मध्य प्रदेशात स्वस्त दराने जमीन उपलब्ध करून देऊ’, असे आश्वासन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.

पुण्यातील ‘पिनॅकल ग्रुप’चे सुधीर मेहता यांनी तेथील पितमपूर येथे ‘ग्रीन फिल्ड’ प्रकल्पात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविल्याचेही चौहान यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योगसमूहांना साद घालण्यासाठी पुण्यात आलेल्या चौहान यांनी उद्योजकांशी संवाद साधला. ‘आपण येत्या काळात मध्य प्रदेशात गुंतवणूक कराल,’ अशी अपेक्षा असून सर्वांचे स्वागत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. ‘उद्योगनगरी मुंबई आणि पुण्यात जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. या महाग जमिनी विकत घेताना उद्योगांना घाम फुटतो. परंतु, मध्य प्रदेशात नव्याने गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना स्वस्तात जागा उपलब्ध करून देण्यात येईल; तसेच तेथे उद्योगांसाठी मुबलक वीज असून, पाण्याचा कोटाही राखून ठेवण्यात आला आहे. मध्य प्रदेशात उद्योगांना किंवा उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा गुंडगिरीचा त्रास होणार नाही,’ असे आश्वासनही चौहान यांनी दिले.

नव्या सरकारला एसटीचा विसर? प्रवाशांकडून विचारला जातोय संतप्त सवाल, कारण…

‘मध्य प्रदेशने २०२६पर्यंत साडेपाचशे अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नव्या उद्योगांसाठी राज्यात सव्वा लाख एकर जमीन उपलब्ध आहे. येत्या काळात १५ हजार एकरांवर नवे उद्योग उभारण्याचा प्रयत्न आहे. वेगवान दळणवळणाठी तीन लाख किलोमीटरचे रस्ते करण्यात आले आहेत. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, चांगले प्रशासन आणि वेगवान अर्थव्यवस्था ही आमची उद्दिष्टे आहेत.’

‘नव्या उद्योगांसाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. आपण स्वतः उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी साप्ताहिक आढावा घेतो. उद्योगांसाठी राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्योगांमुळे मध्य प्रदेशात विकास आणि रोजगाराची गंगा सुरू होईल, त्यामुळे पुण्यातील उद्योजकांनी मध्य प्रदेशात यावे,’ असे चौहान म्हणाले.

‘शिंदे यांनी आमच्याकडे यावे’

‘देशातील प्रत्येक राज्याने आपल्या राज्यात अधिकाधिक गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यातील उद्योगांना आकर्षित करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो; तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मध्य प्रदेशातील उद्योगांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण द्यावे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी स्पर्धा केल्यास अर्थव्यवस्था वाढीस हातभार लागेल,’ असे शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here