मुंबई : दिवाळीच्या खरेदीसाठी मॉल, बाजारामध्ये गर्दी उसळली असताना मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून पश्चिम उपनगरातील दोन प्रसिद्ध मॉल आणि हॉटेल उडविण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस कामाला लागले. मध्यरात्रीपर्यंत शोधकार्य घेऊन काहीच सापडले नाही. यानंतर वारंवार फोन करणाऱ्या तरुणाला वाकोला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. हा तरुण मद्यपी असून नशेमध्येच त्याने हे फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने नाव न सांगताच अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहूतील पीव्हीआर आणि सहारा हॉटेल बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. पश्चिम उपनगरातील ही तिन्ही ठिकाणे वर्दळीची असल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यातच दिवाळीमुळे या ठिकाणी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. बॉम्ब शोधक-नाशक पथक, तसेच वेगवेगळ्या पथकांनी तिन्ही ठिकाणी जाऊन मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्व परिसर पिंजून काढला. संशयास्पद असे काहीच न आढळल्याने ही केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एक फोन आला. सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटलेमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे, अशी माहिती समोरील व्यक्तीने दिली. यामुळे पोलिस पुन्हा एकदा कामाला लागले, मात्र हीदेखील अफवाच निघाली.

मुंबई पोलिस दलातील ४० हजार पोलिसांना अखेर मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

वारंवार येणाऱ्या धमक्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याला दारूचे व्यसन असून मद्याच्या नशेतच तो हे फोन करत असल्याचे स्पष्ट झाले. याआधी त्याने मुंबई विद्यापीठही उडवून देण्याची धमकी दिली होती. त्याच्यावर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. मुंबईसह इतरही ठिकाणी त्याने अशाप्रकारे धमक्या दिल्याची माहिती मिळत असून पोलिसांकडून याबाबत शहानिशा केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here