: चेंबूर टिळकनगर येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेची सोमवारी घरातच धारदार शस्त्राने वार करून आणि गळा दाबून हत्या करण्यात आली. सजनाबाई धोंडीबा पाटील असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याने पोलिसांप्रमाणे गुन्हे शाखेचे पथकही तपासकामाला लागले आहे.

चेंबूरच्या पेस्टम सागर परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये सजनाबाई राहत होत्या. मुलबाळ नसल्याने त्यांनी बहिणीच्या मुलाला आपल्या मुलासमान मानले होते. हा मुलगा आणि सूनही तिच्यासोबत राहत होते. सोमवारी दुपारी सजनाबाई एकट्याच घरात असताना, त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या अंगावर शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. इतकेच नाही, तर त्यांचा गळाही आवळण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत माहिती मिळताच टिळकनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सजनाबाई यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार

घटनास्थळाचा पंचनामा केला असता, घरातील सामान अस्ताव्यस्त होते. तसेच कपाटातील काही वस्तू गायब असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घरच्यांकडे चौकशी करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेज, इमारतीमध्ये राहणाऱ्या इतर रहिवाशांची देखील विचारपूस केली जात आहे. घरगुती वाद, इमारतीमध्ये राहणाऱ्यांशी भांडण असे काही होते का? याबाबतही चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

१४ वेळा भोसकले

फ्लॅटमधील बाथरूममध्ये महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. महिलेची धारदार शस्त्राने १४ वेळा भोसकून हत्या केली. तिच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा आहेत. तसंच तिचा गळाही आवळल्याचे प्राथमिक तपासात दिसून येते. घरातील अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तूंवरून चोरीच्या उद्देशाने महिलेची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here