पुणे : शिरूर तालुक्यातील जांबुत येथे घरासमोर दबा धरून बसलेल्या बिबट्याने पूजा नरवडे या १९ वर्षीय तरुणीला फरफटत नेत तिच्यावर हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सदर तरुणीचा मृत्यूही झाला. गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नागरिकांनी आक्रोश व्यक्त करत पिंजरा लावण्याची मागणी केली होती. अखेर तब्बल १५ दिवसांच्या कालावधीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. आज सकाळी ८ च्या सुमारास नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

जांबूत परिसरातील जोरीमळा येथे १५ दिवसांपूर्वी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पूजा नरवडे ही कामानिमित्त बाहेर आली होती. मात्र जवळच दबा धरून बसलेला बिबट्या तिला दिसला नाही. बिबट्याने तिच्या अंगावर झेप घेत तिचा गळा पकडला. त्यानंतर बिबट्याने तिला उसाच्या शेतात २०० फूट अंतरापर्यंत ओढत नेले. ही बाब लक्षात येताच मुलीच्या आईने आरडा ओरडा केला. मदतीसाठी शेजारी राहणारे लोक धावूनही आले. माणसं येताना पाहतच बिबट्याने तरुणीला सोडून घटनास्थळावरून धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात तिच्या मानेला खोलवर जखम झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. जांबूत येथे हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

सेल्फीवरुन आधी राज ठाकरे भडकले, मग ‘कुठे तो दाढीवाला मुलगा?’ म्हणत स्वतःच फोटो दिला

दरम्यान, या अगोदर या परिसरात सचिन जोरी या तरुणाचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं, अशी मागणी नागरिकांमधून केली जात होती. त्यानंतर वनविभागाने सतर्कता दाखवत पिंजरा लावला आणि १५ दिवसांच्या कालावधीनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here