कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध भागात मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने शेतामध्ये आणि घरात पाणी शिरले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू असून काल रात्री झालेल्या ढगफुटीमुळे शिरोळ तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. सांगली-कोल्‍हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली गेला आहे, तर काही ठिकाणी वीज कोसळल्याची घटना घडली आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस तब्बल दीड तास विजेच्या कडकडाटासह बरसत होता.

उदगाव येथे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्याचबरोबर उदगाव-रेल्वे स्टेशन चिंचवड-शिरोळ, उदगाव-उमळवाड यासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात अनेक दुकाने, घरात पाणी शिरल्याने खळबळ उडाली. दीड तासांत ११८ मिलिमीटर पाऊस पडल्याने शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवड यासह परिसरातील शेतात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे.

आईसमोरच १९ वर्षीय तरुणीला बिबट्याने फरफटत शेतात नेलं; नरभक्षक बिबट्या अखेर १५ दिवसांनी जेरबंद

जयसिंगपूर येथे अनेक इलेक्ट्रिक दुकाने, शोरूम्‍स, घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने ऐन दिवाळीत नागरिकांची दैना उडाली. मध्यरात्री शिरोळ तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत.

पाण्यामुळे एसटीचाही खोळंबा

मुसळधार पावसामुळे शिरोळ-शिरटी रस्त्यावर जगदाळे वीटभट्टीजवळ रस्त्यावर दोन फूट पाणी आले आले. शिरोळ-रस्‍त्‍यावर पाणी आल्‍याने कामावर जाणाऱ्या नागरिकांची अडचण झाली आहे. काही नागरिक मात्र धाडस करून पाण्यातून मार्ग काढत रस्‍ता ओलांडण्याचा प्रयत्‍न करत आहेत. दरम्‍यान रस्‍त्‍यावर आलेले पाणी बघण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली आहे. हसूरकडून- शिरटीमार्गे शिरोळला जाणारी एसटी रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे थांबली. पाण्यातून पुढे जाता येत नसल्याने अनेक वाहनधारकांना मागे फिरण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here