तसेच महाराष्ट्राच्या नवनिर्मिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि शरद पवारांचा मोठा हात आहे आणि नवनिर्मिती करणाऱ्या शरद पवारांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचा विकास कोणी केला याची कल्पना सर्वांनाच आहे. शेतकऱ्यांना देखील याची कल्पना आहे. पवार साहेबांचे विचार आणि पक्ष कोणीच संपू शकत नाही. त्यामुळे असा पक्ष संपणार नाही,असा टोलाही रोहित आर आर पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय कार्यालय व बारामतीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल आणि ९०% राष्ट्रवादी ही भाजपात विसर्जित होईल, असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केला आहे, यावरून रोहित आरआर पाटलांनी बोलताना हा पलटवार केला आहे.
नेमके काय म्हणाले होते पडळकर?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागला आहे. भाजपचा हा झेंडा येत्या काळामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर दिसेल, असे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो असे पडळकर यांनी म्हटले होते. आता आपल्याला भाजपमध्येच जावे लागेल असे ९० टक्के कार्यकर्ते म्हणतील आणि मग मुंबईच्या कार्यालयावर नेमका कोणाचा झेंडा लागेल असा त्यांच्यात वाद निर्माण होईल. तर बहुमताने लोक भारतीय जनता पक्षात येतील असेही पडळकर बोलताना पुढे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार युवानेते रोहित पाटील यांनी घेतला आहे.