म. टा. प्रतिनिध । नगर

सरकार म्हणाले शेतकऱ्यांना बांधावर खत देणार, बांधावर दूरच दुकानातही मिळेना. दुकानदारांनी साठेबाजी केली म्हणून कृषिमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन केले. खत विक्रीसाठी नियमावली तयार झाली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित असताना त्रासच सहन करावा लागत आहे. करोनाचा संसर्ग वाढत असताना शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन दुकानांपुढे रांगा लावाव्या लागत आहेत. खत विक्री आणि करोना प्रतिबंधक उपायांचेच जणू खत होत आहे.

वाचा:

यावर्षी पाऊस वेळेवर आला तरी शेतकऱ्यांची संकटे संपलेली नाहीत. एक तर अनेक भागात सदोष बियाणे पुरवठा झाल्याने दुबार पेरणीचे संकट आले. करोनासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही शेतीला फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे. सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेतीची चर्चा सुरू असली तरी बहुतांश शेतकरी रासायनिक खतांवरच अवलंबून आहेत. पावसाळ्याच्या सुरवातीला नायट्रोजनयुक्त खत म्हणून युरिया खताला मोठी मागणी असते. यंदा खतांच्या पुरवठ्यालाही करोनाचा फटका बसला आहे. मात्र, यातही संधीचे सोने करणाऱ्या काही वितरकांकडून साठेबाजी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. तक्रारी वाढल्यानंतर कृषिमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर दुकानदारांविरुद्धची कारवाई कडक करण्यात आली.

याचा परिणाम उलटाच झाला. बहुतांश दुकानदार आता नियमावर बोट ठेवत व्यवसाय करू लागले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पुरवठा कमी होत आहे, तर मागणी जास्त. त्यामुळे ग्रामीण भागात दररोज खतांच्या दुकानांसमोर रांग लावायची. खत मिळाले तर तर ते घेऊन जायचे, अन्यथा दुसऱ्या दिवशी पुन्हा रांग, असे प्रकार सुरू आहेत. रांगा लावताना करोनासंबंधीच्या उपायांकडे दुर्लक्ष होत असल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. ग्रामीण भागात करोनाचा झपाट्याने प्रसार होत असताना असे प्रकार परवडणारे नाहीत.

खतांच्या प्रश्नावर मधल्या काळात विरोधी पक्षांनी आवाज उठविण्यास सुरवात केली होती. मात्र, नवे मुद्दे मिळाल्याने त्यांनीही हा विषय मागे टाकला. प्रशासन सध्या करोना उपाययोजनांना प्राधान्य देत आहे. कृषी विभाग किंवा अन्य संबंधित विभागांचे बहुतांश अधिकारी घरूनच काम करीत आहेत. पडत्या पावसाचा फायदा घेत खतांचा डोस देऊन पिकांची वाढ करण्याची संधी दवडू नये, यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रांगेत उभे राहत आहेत. त्यांच्यासोबतच इतरांचाही धोका वाढत आहे. खतांच्या वितरणासाठी ठरवून दिलेले कडक नियम पाळायचे की गर्दी होऊ नये, या पद्धतीने वितरण व्यवस्थेत बदल करून विक्री करायची, यातून मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here