औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात दहेगाव, पेंढापूर येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांची कैफियत जाणून घेतली आणि त्यानंतर शेतातच पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘अतिशय विचित्र अवस्थेत सध्या आपण आहोत, एका बाजूला दिवाळी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. दिवाळी साजरी करणं तर दूरच पण घरात अन्न काय शिजवायचं, असा प्रश्न आपल्या अन्नदात्याला पडला आहे. पण सरकारचं या परिस्थितीकडे लक्ष नाही. आपल्या उपमुख्यमंत्र्यांकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. नुकतंच पुण्यात जास्त पाऊस झाल्यावर ते म्हणाले की पाऊस किती पडावा हे महापालिकेच्या हातात नसतं. आताही राज्यभरात अतिवृष्टी झाल्यानंतर ते म्हणू शकतात की हा पाऊस सरकारच्या हातात नसतो,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्रातून मान्सूनची अखेर माघार; मुंबई, पुणेसाठी हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी आपलं दु:ख मांडताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘पावसामुळे हातात काहीच उरलं नाही. मोठा खर्च करून आम्ही पिकं आणली होती. पण सर्वच्या सर्व पिके पाण्याखाली गेली. आता आम्ही दिवाळी तरी कशी साजरी करायची?’ असा उद्विग्न सवाल यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, धीर सोडू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आता आपण रडायचं नाही लढायचं. तुम्ही तुमच्याकडे असलेला आसूड फक्त हातात घेऊ नका, तर तो वापराही, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना करत सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here