शिवसेनेत घडलेल्या सर्व घडामोडीनंतर, पक्षातील आमदार खासदारसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम असणार. कारण, बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या. बाळासाहेबांचं नुसतं आवाहन नव्हे तर शब्द होय, मग त्यांचा शब्द मोडायचा एवढी हिम्मत नाहीये, असं मुरलीधर माधवराव सुर्वे हे नेहमी सांगतात. त्यांचं अकोल्यात एक चहाचं दुकान आहे, जिथे बाळासाहेबांचे अनेक फोटो लावलेले दिसतात. तसेच, त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जो गणवेश दिलाय त्यावरही बाळासाहेबांचा फोटो आहे. सुर्वे हे बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत. ते स्वत: देखील बाळासाहेबांसारखीच रुद्राक्षांची माळ घालतात. त्याशिवाय त्यांच्या गळ्यात बाळासाहेबांचा फोटो असलेली माळ देखील आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक

मुरलीधर माधवराव सुर्वे हे मूळ अकोल्यातील आहेत. सध्या त्यांचं राहणं अकोला शहरातील आळशी प्लांट भागात आहे. माधव राव सुर्वे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक अन् चहाते आहेत. बाळासाहेबांची भाषणं आणि विचार आजही त्यांच्या हृदयात घर करुन बसले आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आज सुर्वे करत आहेत. सुर्वे यांनी सन १९९७ पासून ‘मुरली चहा’चं कॅन्टीन सुरु केलं. मूर्तिजापूर रस्त्यावर नेहरू पार्क चौक स्थित त्यांचं कॅन्टीन आहे.

३६ लाखांची उलाढाल

कॅन्टीनच्या सुरुवातीला त्यांनी ५० पैसे हाफ अन् फूल १ रूपयाप्रमाणे चहां विकला आणि आता १० रूपये हाफ अन् फूल २० रूपये असे चहाचे दर आहेत. सध्या त्यांच्या चहाच्या कॅन्टीनच्या व्यवसायातून ३६ लाखांची उलाढाल होत आहे. तर खुद्द १२ लाखांवर उत्पन्न घेतायत. तसेच, त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. सध्या त्यांच्या दुकानावर चार मजूर काम करतात. दरम्यान, मुरली चहाच्या कॅन्टीनची अकोला शहरात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरही बाळासाहेबांचा फोटो

गुगलवर सर्च केलं की अकोल्यात सर्वात बेस्ट चहा कुठे मिळतो, तर मुरली चहा सर्वप्रथम येतो. कारण, इथे मिळणारा चहा नुसताच चहा नव्हे तर चॉकलेटची चवही यामध्ये असते. त्यामुळे याला चॉकलेट चहा असंही म्हटलं जातं. दरम्यान, दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक मजुराच्या अंगावर एकाच कलरची टी-शर्ट, अन टी-शीर्टवर छातीवर बाळासाहेबांचा फोटो आणि पाठीवर ‘मुरली चहा’ दिसतो. माधवराव सुर्वे हे स्वतःही बाळासाहेबांसारखा वेश परिधान करतात. माधवराव यांच्या गळ्यात तीन ते चार रुद्राक्ष माळा, डोक्यावर टिळा अन् गळ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेलं लॉकेट असतं.

नजर जाईल तिथे बाळासाहेब

माधवराव यांच्या कॅन्टीनवर बाळासाहेब ठाकरे यांचे वेगवेगळे फोटो लावलेले आहेत. येथे बाळासाहेबांचे तब्बल १२ पेक्षा अधिक फोटो लावलेले दिसतात. दुकानावर भगवे झेंडे आहेत. माधवराव हे सध्या शिवसेनेत कोणत्याही पदावर नाही. ते फक्त बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आणि चाहते आहेत. कॅन्टीनमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासोबत ते बाळासाहेबांच्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार नेहमी मांडत असतात. त्यामुळे चहा पिण्यासाठी इथे येणाऱ्या ग्राहकांना वेगळाच आनंद मिळतो. दरम्यान, कॅन्टीनवर येणारा प्रत्येक व्यक्ती म्हणतोय ‘अहो ठाकरे चहा द्या’, आज अकोल्यात माधवराव सुर्वे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि चहासाठी ओळखले जातात.

जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही

दरम्यान, शिवसेनेत घडलेल्या सर्व घडामोडीनंतर, पक्षातील आमदार खासदारसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. पण, आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कायम असणार. कारण, बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळून घ्या. बाळासाहेबांचं नुसतं आवाहन नव्हे तर शब्द होय, मग त्यांचा शब्द मोडायचा एवढी हिम्मत नाहीये. त्यामुळे आज उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे यांच्या सोबत सैदव राहणार. जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत उद्धव साहेबांची साथ कधीही सोडणार नाही, अशी भावनाही माधवराव सुर्वे यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना व्यक्त केली आहे. तसेच, ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यांच्यामुळेच आज शिवसेना उभी झालीये अन् एक चळवळ झालीये, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here