पांड्यासोबत शतकी भागिदारी करत कोहलीनं भारताला विजय मिळवून दिला. पॉवरप्लेमध्ये उडालेली दाणादाण पाहता विजय अशक्यप्राय वाटत होता. हा सामना कुठे अन् कसा फिरला ते विराट कोहलीनं सामना संपल्यानंतर इरफान पठाण आणि जतीन सप्रूला सांगितलं. हार्दिक फलंदाजीला आला, त्यावेळी आमची परिस्थिती बिकट होती. स्ट्राईक रोटेट करायचा. एखादा खराब चेंडू मिळाल्यावर चौकार, षटकार ठोकायचा हीच आमची रणनीती होती, असं विराट म्हणाला.
विराट भाई हो जाएगा, हो जाएगा, असं हार्दिक मला सातत्यानं सांगत होता. शेवटच्या ३ षटकांमध्ये ५० धावा होत्या. यातील एक षटक हारिस रौफ टाकणार ते आम्हाला माहीत होतं. रौफवर हल्ला चढवला तर पाकिस्तानचा संघ पॅनिक होणार हे मी हार्दिकला सांगितलं, अशा शब्दांत कोहलीनं हायव्होल्टेज सामन्यातील संवाद सांगितला.
रौफ गोलंदाजी करताना ८ चेंडूंत २८ धावांची गरज होती. त्यावेळी मी स्वत:ला एक गोष्ट सांगितली. आता २ चेंडूंमध्ये २ षटकार ठोकायलाच हवेत. अन्यथा आपण सामना हरू. मग पुढच्या २ चेंडूंवर २ षटकार ठोकले आणि लक्ष्य आवाक्यात आलं, असं कोहली म्हणाला. अक्षर पटेल धावबाद झाला त्यावेळी पांड्या फलंदाजीला आला. त्यावेळी आमची अवस्था वाईट होती. हा सामना शेवटपर्यंत न्यायचा हीच आमची रणनीती होती, असं कोहलीनं सांगितलं.