शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाझच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक बाद झाला. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूवर केवळ तीन धावा आल्या. त्यामुळे विजयासाठी ३ चेंडूंमध्ये १३ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर कोहलीनं षटकार ठोकला. हा चेंडू कंबरेच्या वर असल्याचं कोहलीनं पंचांच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे पंचांनी नोबॉल दिला. त्यामुळे पुढचं समीकरण ३ चेंडू ६ धावा असं झालं.
३ चेंडूंत ६ धावा हव्या असताना कोहलीला फ्री हिट मिळाला. नवाझनं वाईड बॉल टाकला. त्यामुळे ३ चेंडू ५ धावा असं समीकरण झालं. फ्री हिटवर कोहली बोल्ड झाला. चेंडू स्टम्पला लागून थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. ते पाहून कोहली आणि कार्तिक पळत सुटले. मैदान मोठं असल्यानं त्यांनी ३ धावा पळून काढल्या. या तीन धावांवर पाकिस्तानी चाहत्यांना आक्षेप आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगनंदेखील यासंदर्भात ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे.
नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार, फलंदाज फ्री हिटवर क्लीन बोल्ड झाल्यास चेंडू डेड दिला जात नाही. विराट कोहली फ्री हिटवर बोल्ड झाला, त्यामुळे तो नाबाद होता. त्यामुळे चेंडू डेड दिला गेला नाही. चेंडू कोहलीच्या बॅटला लागला नसल्यानं तीन धावा बाईज म्हणून मोजण्यात आल्या. हा नियम खूप कमी जणांना माहीत आहे. याबद्दल निर्णय देताना पंचांनी एकमेकांशी चर्चा केली होती. त्यामुळे जो निर्णय देण्यात आला तो नियमानुसारच देण्यात आला.