पुणे : लक्ष्मीपूजनाला अवघा एक दिवस राहिला, तरी पावसामुळे अर्धवट राहिलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी पुणेकरांनी रविवारी सकाळपासूनच बाजारपेठेत गर्दी केली. रांगोळी, पणत्या, झेंडू-शेवंतीसह अनेक प्रकारची फुले, पूजा साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी बघायला मिळाली. बाजारपेठांबरोबरच आपापल्या गावाला निघालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानके गजबजली होती.

शहरात गेल्या दहा दिवसांपासून रोज संध्याकाळी हजेरी लावणाऱ्या पावसामुळे अनेकांना दिवाळीची खरेदी करता आली नव्हती. धनत्रयोदशीला सोनेखरेदीचा मुहूर्त अनेकांनी साधला; पण फुले, पूजासाहित्य, रेडिमेड फराळासह कपडे खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासून बाजारपेठेत गर्दी केली. दुपारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच असल्याने बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली होती. संध्याकाळी साडेसहानंतर मात्र दुकाने ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा गजबजली.

उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा विरोधकांच्या निशाण्यावर; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा टोला

यंदा नरक चतुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे खरेदीसाठी स्वतंत्र दिवस मिळणार नसल्याने रविवारी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, महात्मा फुले मंडई परिसर, रविवार पेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली. झेंडू, शेवंती, गुलबक्षी, मोगरा अशा विविध फुलांनी बहरलेली मंडई, मार्केट यार्ड बघतानाही प्रसन्न वाटत होते. यंदा पावसाचा फटका बसल्याने फुलांचे प्रमाण कमी होते आणि चढ्या दराने विक्री सुरू होती. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी झेंडूच्या फुलांचे तोरण, लक्ष्मीची मूर्ती, केरसुणी, लाह्या बत्तासे आणि इतर पूजा साहित्याचे स्टॉल लागले होते. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिक मोकळेपणाने रस्त्यावर फिरताना दिसले. मध्यवर्ती पुण्याबरोबरच उपनगरांमधील बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली.

विराट कोहलीने केली कमाल; पंतप्रधान मोदीही भारावले, कौतुक करत म्हणाले…

आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आज, सोमवारी एकाच दिवशी आले आहे. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानापासून होते. दुपारनंतर लक्ष्मीपूजन करण्याचे मुहूर्त आहेत. मुहूर्तानुसार नागरिकांनी घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि पेढ्यांमध्ये आपल्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करावे, असे पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी मार्गशीर्षातील वेळा अमावस्या शुभ असते, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते, असे दाते यांनी सांगितले.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

दुपारी ३ ते सायं. ६

सायं. ६ ते रात्री ८.३०

रात्री १०.३० ते रात्री १२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here