ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस
यंदा मान्सून पूर्ण माघारी फिरायच्या आधी १ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा ६५टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. एकूण १०४.२ मिलीमीटर सरासरी पाऊस या काळात पडला. सर्वसाधारपणे या कालावधीत ६३.२ मिलीमीटर पाऊस पडतो. ११ राज्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, १२ राज्यांमध्ये अतिरिक्त, १० राज्यांमध्ये सरासरीइतका तर तीन राज्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस पडल्याची या कालावधीत नोंद झाली. दिल्लीमध्ये ४६९ टक्के, उत्तर प्रदेशात ४२५ टक्के, उत्तराखंडमध्ये ३०४ टक्के, राजस्थानमध्ये २०८ टक्के, मध्य प्रदेशात २१८ टक्के सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या १०२ टक्के पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये अधिक पडला आहे.
बहुतांश जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस
ऑक्टोबरमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबरच्या सरासरीहून अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात १३३ टक्के, मराठवाड्यात १०२ टक्के तर विदर्भात ७१ टक्के पाऊस अतिरिक्त पडला. कोकण विभागात सर्वात जास्त अतिरिक्त पाऊस मुंबई उपनगरांनी अनुभवला. सरासरीच्या १९४ टक्के अतिरिक्त पावसाची उपनगरांमध्ये नोंद झाली. अहमदनगर येथे १९७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली.
मुंबईचे किमान तापमान २० अंशांवर
मुंबईच्या उपनगरांमध्ये रविवारी सकाळी किंचित गारठ्याची जाणीव झाली. सांताक्रूझ येथे किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअसवर उतरले. कुलाबा येथे मात्र २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शनिवारी कुलाबा येथे २६.५ तर सांताक्रूझ येथे २५.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. सांताक्रूझ येथे ४.६ अंशांनी किमान तापमानात घसरण झाली. मुंबईसोबतच डहाणू तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येही सरासरी तापमानापेक्षा किमान तापमान उतरल्याचे आढळून आले आहे. दिवाळीमधील गारठ्याची पहाट यंदा अनुभवायला मिळणार नसली तरी किमान दोन दिवस किमान तापमान फारसे चढणार नाही, असा अंदाज आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानावर परिणाम केल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. मुंबईमध्ये पुढील दोन दिवस २० ते २२ अंशांदरम्यान किमान तापमान राहील तर सोमवारी कदाचित कमाल तापमानातही किंचित घसरण होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.