सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी ‘राष्ट्रवादी’ सोडण्याचा निर्णय घेतला असून, दिवाळीनंतर ते आपला राजकीय ‘बार’ उडवणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांची उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्या कार्यालयात रात्री भेट घेऊन चर्चा केली होती. ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, माजी शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कारभारावर कायमच कोल्हे टीका करीत होते. त्यांची पदे बदलण्यासाठी ते कायमच आक्रमक दिसून आले. दरम्यानच्या काळात महेश कोठे यांनी ‘राष्ट्रवादी’शी घरोबा केल्यानंतर दिलीप कोल्हे कोठे यांच्यासोबत दिसले; पण कोठेही ‘राष्ट्रवादी’त रस दाखवीत नसल्याने कोल्हे यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क काढले जात होते. मधल्या काळात कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी संपर्क वाढवला आहे, त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पुन्हा त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपला प्रवेश पक्का केला आहे. दिवाळीनंतर ते प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
‘आत्मचिंतन करून बोला’
‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन करून थांबवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली, तेव्हा कोल्हे यांनी उलट ‘मी का जातोय, याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला,’ असा उलट सवाल केल्याचे समजले. पवारनिष्ठ कोल्हे ‘राष्ट्रवादी’ सोडत असल्याने हा पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.