Maharashtra Politics | रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार संघर्ष. रवी राणांच्या (Ravi Rana) टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये खेचले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले आहे.

हायलाइट्स:
- ‘५० खोके, एकदम ओक्के’ची घोषणा
- पावसाळी अधिवेशनात या घोषणेवरून रणकंदन झाले होते
अशातच बच्चू कडू यांच्या या आव्हानामुळे शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ‘५० खोके, एकदम ओक्के’ची घोषणा देत बंडखोर आमदारांना जेरीस आणले होते. पावसाळी अधिवेशनात या घोषणेवरून रणकंदन झाले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) इतर नेत्यांकडून अधुनमधून खोक्यांचा उल्लेख होत असला तरी ‘५० खोके, एकदम ओक्के’ या वाक्याचा अनेकांना विसर पडला होता. परंतु, आता बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादामुळे खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. परिणामी या मुद्द्यावरुन शिंदे गटावर पुन्हा एकदा दोषारोप करण्याची संधी विरोधकांकडे चालून आली आहे.
तसेच यावेळी बंडखोर आमदारांना खोके मिळाल्याचा आरोप दुसरा तिसरा कोणी केला नसून भाजपशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांनीच केला आहे. हा शिंदे-फडणवीस सरकारला एकप्रकारे घरचा आहेरच आहे. रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बंडखोरांनी भाजपसोबत जाण्यासाठी पैसे घेतले, या विरोधकांच्या दाव्याला बळ मिळू शकते. त्यामुळे आगामी काळात ‘५० खोके, एकदम ओक्के’चा प्रचार पुन्हा जोमाने होऊ शकतो. त्यामुळे आता हा सगळा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.
बच्चू कडुंचा राणांवर प्रहार
रवी राणा यांनी माझी बदनामी केली. २०-२० वर्ष आमची राजकीय करिअर उभे करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल, तर पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. तर तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा, अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे कडू म्हणाले. इतकेच नाही तर येत्या १ तारखेपर्यंत रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, त्यांनी ते पुरावा सिद्ध करून दाखवले. तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल. माझी लढाई शांततेची आहे. मात्र, जास्त अंगावर आले तर आरपार करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.