कल्याण : गरिबांच्या घरची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेला आनंदाचा शिधा अजूनही आदिवासी भागात पोहोचला नसल्याचे वास्तव मान्य करताना केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य शासनाने आनंदाचा शिधा योजनेची घोषणा थोडी उशिराच केल्याची कबुली दिली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहत असून, या आदिवासी पाड्यांवरील गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेशन दुकानातून तेल, चणाडाळ, रवा, साखर यासारखे जिन्नस अंत्योदय योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. मात्र अनेक भागांतील रेशन दुकानांत अंत्योदय योजनेतील साहित्य ३० ते ४० टक्केच पोहोचले आहे. यामुळे अनेकांना रेशन दुकानातून रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मुरबाडमध्ये आनंदाचा शिधा ३०० रुपयांत विकल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची दखल राज्य सरकारने याची दखल घेतली आहे. या दुकानाचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ऐन दिवाळीत राज्यात मोठा अपघात, एका पाठोपाठ रेल्वेचे २० डबे रूळावरून घसरले; ६ गाड्या रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीबीमुक्त भारत योजनेच्या माध्यामतून शासनाने प्रत्येक खासदाराला पाच क्षयरुग्ण दत्तक घेण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात असलेल्या ४५०० क्षयरुग्णांना दत्तक घेतल्याचे सांगितले. त्यांना लागणारी सर्व औषधे मोफत उपलब्ध करून दिली जात असून, आपण देखील क्षयरुग्ण मुक्त भिंवडी लोकसभा मतदारसंघ, असे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले.

दोन दिवसांत शिधा

दिवाळी सुरू झाली असून पुढील दोन दिवसांत प्रत्येकाच्या घरात हा शिधा पोहोचला पाहिजे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. दिवाळी पहाटनिमित्त खासदार कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आलेल्या खासदार पाटील यांनी शिधा योजनेचाही आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here