बच्चू कडू-रवी राणा संघर्षाचा सत्ताधाऱ्यांच्या एकजुटीवर विपरीत परिणाम?
राज्यात सत्तांतर होत असताना बंड करत गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी ५० खोके घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांच्याकडून करण्यात आला आहे. महाविकास आघाडीचे नेते जी भाषा वापरतात, त्याच भाषेत भाजप समर्थक अपक्ष आमदाराने आरोप केल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. रवी राणा यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या आरोपांना बळ मिळत असल्याचं सांगत शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू-राणा हा वाद लवकरात लवकर मिटावा, अशी अपेक्षा सत्ताधारी गोटातून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, रवी राणा यांनी माझी बदनामी केली. आमची २०-२० वर्ष राजकीय करिअर उभे करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल, तर पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. या संदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील नोटीस पाठवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले होते. त्यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी मध्यस्थीची तयारी दाखवल्याचं सांगितलं जात असल्याने आगामी काळात खरंच विदर्भातील या दोन नेत्यांचं मनोमिलन होणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.