मेलबर्न: शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. विराट कोहलीच्या घणाघाती खेळीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. गेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्याचा बदला भारतानं यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात घेतला. ४ बाद ३१ अशा बिकट अवस्थेतून विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी सामना अक्षरश: खेचून आणला. त्यांच्या खेळींमुळे भारतानं अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला.

विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावा, त्याला हार्दिक पांड्यानं ४० धावा करुन दिलेली सुंदर साथ यांच्यामुळे टीम इंडियानं विजय साकारला. शेवटच्या ३ षटकांत ४८ धावांची गरज असताना कोहलीनं गियर बदलला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. डावाच्या सुरुवातीला भेदक वाटणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांनी विराटसमोर लोटांगण घातलं. शेवटच्या षटकात तर हायव्होल्टेज ड्रामा झाला. या षटकात भारतानं दोन फलंदाज गमावले. पण कोहलीनं मोक्याच्या क्षणी समयसूचकता दाखवली आणि भारतानं रोमहर्षक विजय मिळवला.
हेच पाहायचं राहिलं होतं! पाकचे चाहते सैरभैर, दिग्गज क्रिकेटरला मध्ये ओढलं अन् लाज काढून घेतली
काल झालेल्या सामन्याच्या आठवणी भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात ताज्या आहेत. अनेकांनी तर सामन्याचे हायलाईट्स वारंवार पाहिले आणि कोहलीची खेळी डोळ्यात साठवून घेतली. कालचा रंगतदार सामना पाहता याच स्पर्धेत पाकिस्तान पुन्हा एकदा भारतासमोर येईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. पण असं घडण्याची शक्यता कमी आहे.

भारत आणि पाकिस्तानची लढत झालीच तर ती केवळ अंतिम सामन्यातच होऊ शकते. त्यासाठी दोन्ही संघांची पुढील कामगिरी उत्तम होणं गरजेचं आहे. भारत, पाकिस्तानच्या गटात बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, झिम्बाम्बे, नेदरलँडचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान त्यांच्या गटात टॉप २ वर राहिल्यास त्यांना उपांत्य फेरी गाठता येईल. तिथे त्यांना ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका यांच्यापैकी एकाचा सामना करावा लागू शकतो. भारत आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत बाजी मारल्यास ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर चाहत्यांना भारत वि. पाकिस्तान सामना पाहता येईल.
फ्री हिटवर बोल्ड झाल्यावर विराटनं ३ धावा काढल्या; पाकिस्ताननं वाद घातला; नियम काय सांगतो?
२००७ ची पुनरावृत्ती होणार?
२००७ मध्ये पहिलीवहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली. त्यावेळी भारत, पाकिस्तान एकाच गटात होते. गट साखळीत भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं. सुपर ८ मध्ये भारत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं उपांत्य फेरी गाठली. तर पाकिस्ताननं श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत पाकिस्ताननं न्यूझीलंडचा, तर भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले. हा सामना जिंकत भारतानं स्पर्धा जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here