शोएब अख्तरने कालच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर एक ट्विट केले. या ट्विटमध्ये शोएबने शेवटच्या षटकात विराट कोहली फलंदाजी करत असताना देण्यात आलेल्या नो बॉलविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शेवटच्या षटकात पाकिस्तानचा मोहम्मद नवाज गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने षटकार मारला. मात्र, हा चेंडू कमरेच्या वर असल्याचे सांगत विराट कोहलीने नो बॉलसाठी अपील केले. पंचांनी विराट कोहलीचे अपील उचलून धरत हा चेंडू नो बॉल ठरवला. त्याच्याच पुढच्या चेंडूवर विराट कोहलीने काढलेल्या तीन धावा या सामन्यात निर्णायक ठरल्या. हाच मुद्दा धरून शोएब अख्तरने पंचांच्या निर्णयाविषयी शंका उपस्थित केली आहे.
मैदानातील पंचांनी मोहम्मद नवाजचा चेंडू नो-बॉल ठरवला होता. या पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, तो बॉल फेअर डिलिव्हरी होता. अख्तरने लिहिले की, ‘अंपायर बंधूंनो, आज रात्री तुम्ही या गोष्टीचा विचार करायला हवा.’ परंतु, हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अशा उत्कंठावर्धक क्षणांमुळेच भारत-पाकिस्तान मॅच ही जगातील सर्वात मोठे द्वंद्व असते, असेही शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटले आहे.
फ्री हिटवर बोल्ड झाल्यावर नियम काय सांगतो?
मोहम्मद नवाजच्या नो बॉलमुळे विराट कोहलीला पुढच्या चेंडूवर फ्री-हिट मिळाला. मात्र, या चेंडूवर विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. परंतु, चेंडू स्टम्पला लागून थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. ते पाहून कोहली आणि कार्तिक पळत सुटले. मैदान मोठं असल्यानं त्यांनी ३ धावा पळून काढल्या. या तीन धावांवर पाकिस्तानी चाहत्यांनी आक्षेप घेतला होता.
आयसीसीच्या नियमानुसार, फलंदाज फ्री हिटवर क्लीन बोल्ड झाल्यास चेंडू डेड दिला जात नाही. विराट कोहली फ्री हिटवर बोल्ड झाला, त्यामुळे तो नाबाद होता. त्यामुळे चेंडू डेड दिला गेला नाही. चेंडू कोहलीच्या बॅटला लागला नसल्यानं तीन धावा बाईज म्हणून मोजण्यात आल्या. हा नियम खूप कमी जणांना माहीत आहे. याबद्दल निर्णय देताना पंचांनी एकमेकांशी चर्चा केली होती. त्यामुळे जो निर्णय देण्यात आला तो नियमानुसारच देण्यात आला.