या कार्यक्रमात शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. ज्यांच्या हातात देशाची, राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी काही ठोस पाऊले टाकली पाहिजे ती टाकायची त्यांची तयारी नाही. निर्णय घ्यायला तयार नाहीत. १९७८ मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा खेड्यापाड्यात मोठा दुष्काळ होता. तेव्हा १५ दिवसांत मी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी आली तेव्हा ३ महिन्यात ७२ हजार कोटींचे शेतकरी कर्ज माफ केले होते, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.
भू विकास बँकेच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांचा सरकारला टोला
भू विकास बँकेच्या कर्जमाफीबाबत शिंदे-फडणवीस सरकारकडून केला जाणारा दावा हा पूर्णपणे फसवा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. मात्र, शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दाव्यातील विसंगती सोदाहरण दाखवून दिली. ते सोमवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
आम्ही भू विकास बँकेतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, असे राज्य सरकारकडून सांगितले जाते. पण मला इथे बसलेल्या लोकांनी सांगावं की, गेल्या १० वर्षांमध्ये किमान एका शेतकऱ्याला तरी भू विकास बँकेचे कर्ज मिळाले आहे का? भू विकास बँक अस्तित्त्वात आहे, ही गोष्ट तरी तुम्हाला माहिती आहे का? भू विकास बँक एकेकाळी होती, पण आता ती राज्यात कार्यरत नाही. आता भू विकास बँकेचे नावही कोणाला माहिती नाही. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भू विकास बँकेने दिलेल्या कर्जांची वसुलीच झालेली नाही. ही वसुली होणार नाही, हे कळल्यानंतर राज्य सरकारने घोषणा केली की, आम्ही भू विकास बँकेतील शेतकऱ्यांची कर्जे माफ करत आहोत. लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं, असा हा एकंदरित प्रकार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.