Maharashtra Politics | काही दिवसांपूर्वीच दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. दिवाळीनंतर शिंदे गटात प्रवेश करताना जवळपास २५ जणांना घेऊन जाणार असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली.

हायलाइट्स:
- पक्ष निरीक्षक शेखर मानेंचा मनमानी कारभार
- राष्ट्रवादी पक्षात फरफट होत असल्याने शिंदे गटात जाण्याचा निर्णय
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे. त्यामुळे पक्षात आपली फरफट होत असल्याचे कारण देत दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा इरादा पक्का केला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीसा होईल, असे दिलीप कोल्हे यांनी सांगितले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, माजी शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या कारभारावर दिलीप कोल्हे टीका करीत होते. त्यांची पदे बदलण्यासाठी ते कायमच आक्रमक दिसून आले. दरम्यानच्या काळात महेश कोठे यांनी ‘राष्ट्रवादी’शी घरोबा केल्यानंतर दिलीप कोल्हे कोठे यांच्यासोबत दिसले, पण कोठेही ‘राष्ट्रवादी’त रस दाखवीत नसल्याने कोल्हे यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क काढले जात होते. मधल्या काळात कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटाशी संपर्क वाढवला आहे, त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.
शेखर मानेंवर सडकून टीका
सांगली येथील राष्ट्रवादी पक्षांचे पक्ष निरीक्षक शेखर माने हे, सोलापुरातील राष्ट्रवादीबाबत खोटी माहिती देतात असा आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केला. पक्षात काही मोजक्या लोकांचे वर्चस्व निर्माण झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक जण इतर पक्षात प्रवेश करत आहेत.पण याबाबत वरिष्ठांना खरी माहिती दिली जात नाही. तसेच महाविकास आघाडी सरकार असताना जुन्या पदाधिकाऱ्यांना अनेक बैठकांसाठी बोलावले जात नव्हते.शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकऱ्याना आतमध्ये देखील प्रवेश दिला नाही, असे आरोप माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी केले.
‘आत्मचिंतन करून बोला’
शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. तेव्हा दिलीप कोल्हे यांनी माने यांना सुनावले होते. ‘मी का जातोय, याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला,’ असे दिलीप कोल्हे यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.