india vs pakistan t20 world cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारतानं गेल्या विश्वचषक स्पर्धेतील पराजयाचा बदला घेतला. शेवटच्या षटकात भारताला १६ धावांची गरज होती. मोहम्मद नवाझनं टाकलेलं अखेरचं षटक उत्कंठावर्धक ठरलं.

शेवटच्या षटकात काय घडलं?
फ्री हिट असलेल्या चेंडूवर कोहलीचा त्रिफळा उडाला. तिथेच पंचांनी चेंडू डेड द्यायला हवा होता. पुढच्या ३ धावा भारताला चीटिंग करून मिळाल्या, असा पाकिस्तानी चाहत्यांचा दावा आहे. यावर ऑस्ट्रेलियाचे पंच सायमन टॉफेल यांनी त्यांचं मत मांडलं आहे. टॉफेल यांची गणना जगातील सर्वोत्तम पंचांमध्ये होते. ५१ वर्षांचे टॉफेल सलग ५ वेळा जगातील सर्वोत्तम पंच राहिले आहेत. २००४ ते २००८ दरम्यान त्यांना हा सन्मान मिळाला.
टॉफेल यांनी सांगितला नियम
एमसीजीमध्ये भारत वि. पाकिस्तान यांच्यातील रोमहर्षक सामना संपल्यानंतर अनेकांनी मला फ्री हिटवरील क्लीन बोल्ड आणि त्यानंतर भारतानं काढलेल्या ३ धावा याबद्दल विचारलं, असं टॉफेल यांनी लिंक्डइनवर म्हटलं आहे. ‘चेंडू स्टम्पला लागला आणि थर्ड मॅनच्या दिशेनं गेला. यावेळी फलंदाजांनी ३ धावा पळून काढल्या. पंचांनी त्या बाय दिल्या. हा निर्णय योग्य आहे. फ्री हिटवर फलंदाज त्रिफळाचीत होऊ शकत नाही. त्यामुळे चेंडू स्टम्पला लागल्यानंतरही डेड होत नाही. चेंडू गेममध्ये असतो. त्यामुळे पळून धावा काढता येतात,’ अशा सोप्या शब्दांत टॉफेल यांनी नियम समजावला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.