राम नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्रकूटमध्ये दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेत गाढवांव्यतिरिक्त घोडे, खेचरही दूरदूरवरून येतात. पण गाढवाची जत्रा किंवा बाजार म्हणून त्याची ओळख आहे. विशेष म्हणजे गाढवांची नावे चित्रपट कलाकारांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत. म्हणजे या जत्रेत शाहरुख, सलमान आणि आमिर यांच्या नावांची बोली लावली जाते. ही बोली लाखोंच्या घरात असते.
कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून ही जत्रा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र यावेळी जत्रेत एकापेक्षा एक गाढवंही पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या जवळच्या जिल्ह्यांमधून व्यापारी आणि पशुपालक त्यांची गाढवं, घोडे आणि खेचर जत्रेत आणतात.
याबाबत स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, १६ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेब त्याच्या काफिल्यासोबत चित्रकूटवर चढाई करण्यासाठी आला होता. येथे त्याच्या ताफ्यातील अनेक घोडे आणि गाढवं रोगाने ग्रस्त होऊन मेले. ताफ्यात गाढवांचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा ही कमरता पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर गुरांचा बाजार भरवण्यात आला. तेव्हापासून आजतागायत हा ऐतिहासिक गाढवांचा मेळा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंदाकिनी तीरावर भरतो.
हा मेळा चित्रकूट नगर परिषद, जिल्हा सतना द्वारे संचलित केला जातो. यंदाही हजारो गाढवं, घोडे, खेचर या जत्रेत विक्री व खरेदीसाठी आणण्यात आले आहेत. या प्राण्यांची नावे चित्रपट कलाकारांच्या नावावर आहेत. त्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. जत्रेत खूप गर्दी असते, कारण पशु खरेदीदारांव्यतिरिक्त दिवाळी जत्रेत येणारे भरपूर लोकही ते पाहण्यासाठी येतात.