भारताने वर्ल्डकपची भन्नाट सुरुवात केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करत धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडियाची वर्ल्डकपमधील दुसरी मॅच आता नेदरलँडविरुद्ध सिडनी येथे होणार आहे. भारतीय संघासाठी ही लढत सोपी असली तरी टीम इंडिया गाफिल राहणार नाही. एकिकडे भारताचे खेळाडू सरावात घाम गाळत असताना भारताचा हा क्रिकेटपटू मात्र बायकोबरोबर फिरत असल्याचे पाहायला मिळाले. हा स्टार क्रिकेटपटू आणि त्याच्या पत्नीने फोटो यावेळी चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सौजन्य-सोशल मीडिया
भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव पत्नी देविशा शेट्टीबरोबर सराव सोडून ऑस्ट्रेलियात फिरत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर त्याचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे. पण संघातील खेळाडू सराव करत असताना आपण पत्नीबरोबर फिरायला जाणे किती उचित आहे, यावर आता सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सूर्या हा खेळाडू म्हणून कसा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला चमक दाखवता आली नाही. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली, पण तरीही तो या सराव सत्राला उपस्थित राहीला होता. त्यामुळे आता सोशल मीडियावर काही चाहते सूर्याला कोहलीचे उदाहरण देत आहेत.