मुंबई : सर्वत्र दिवाळीचा झगमगाट आणि लखलखाट आहे. रोषणाईने इमारती आणि आसमंत उजळून निघाला आहे. असे असतानाही मुंबई आणि राज्यातील वीजमागणीमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवार, २५ ऑक्टोबराला राज्याची वीज मागणी १४ हजार तर मुंबईची २५०० मेगावॉटच्या खाली घसरली होती. हवेतील गारवा काहीसा वाढल्याने व काही कार्यालयांना सुट्टी असल्याने वीज मागणीमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

वातावरणात सातत्याने बदल होत असताना व त्याचवेळी सर्व क्षेत्रे जोमाने सुरू झाली असल्याने मुंबईच्या वीज मागणीने मागील आठवड्यात ३४०० मेगावॉटचा टप्पा गाठला होता. उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच वीज मागणी इतक्या उच्च स्तरावर पोहोचली होती. त्याचवेळी राज्याच्या मागणीनेही १८ हजार ९०० मेगावॉटचा टप्पा गाठला होता. मान्सूनने निरोप घेतला आणि तापमान उतरू लागले. याचा परिणाम वीजमागणीत दिसून आला. मंगळवारी मागणीत आश्चर्यकारक घट झाली. आर्थिक राजधानी मुंबईची कमाल वीज मागणी यंदाच्या उन्हाळ्यात ३८०० मेगावॉटवर गेली होती. त्यानंतर जुलै महिन्यात ही मागणी २५०० मेगावॉटपर्यंत घसरली. सप्टेंबर महिना हा मिश्र वातावरणाचा असताना मागणी २८०० ते ३ हजार मेगावॉटदरम्यान होती. त्यानंतर या महिन्यात सातत्याने मुंबईची वीजमागणी ३१०० मेगावॉटदरम्यान होती.

मागील आठवड्यात मागणीने चार महिन्यांचा उच्चांक गाठला. पण मंगळवारी दुपारी मुंबईची वीजमागणी २३४८ मेगावॉटपर्यंत खाली घसरली. मुंबईला भांडुप ते मुलुंडचा परिसर वगळल्यास उर्वरित भागात बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांच्याकडून वीजपुरवठा होतो. या पुरवठ्यासाठी टाटा पॉवरकडून ४४७ मेगावॉट जलविद्युत, ट्रॉम्बे येथे ७५० मेगावॉट औष्णिक वीज तसेच अदानी इलेक्ट्रिसिटीचा डहाणू येथे ५०० मेगावॉटचे प्रकल्प कार्यरत आहेत. वीज मागणी वाढली असताना सर्व वीजनिर्मिती प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती व वीज पुरवठा करण्यात आला होता.

दिवाळीत धक्कादायक कृत्य! फटाके फोडण्यावरून आदल्या दिवशी वाद; दुसऱ्या दिवशी तरुणाचा खून

५ हजार मेगावॉटहून कमी उत्पादन

राज्याची वीज मागणी मंगळवारी १३ हजार ८०० मेगावॉटपर्यंत घसरली. सायंकाळी यामध्ये थोडी वाढ होऊन ती १४ हजार ४०० मेगावॉटवर गेली. राज्यात मुंबई वगळता सर्वत्र राज्य सरकारी महावितरणकडून वीजपुरवठा होतो. त्यामध्ये सर्वाधिक वीजपुरवठा महानिर्मितीकडून होतो. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांनी मंगळवारी ५ हजार मेगावॉटहून कमीच उत्पादन केले. पण मागणी कमी असल्याने त्याचा वीज वितरणावर परिणाम झाला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here