अहमदनगर:

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरमधील नगरसेवक शिवसेनेत परतले असले तरी मनाने ते राष्ट्रवादीसोबतच असल्याचे आज दिसून आले. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी सुरुवातीला नगरसेवक आलेच नाहीत. ते सर्वजण राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात असल्याची माहिती मिळाल्यावर कोरगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना फोन लावला. त्यानंतर लंके त्या नगरसेवकांना घेऊन सरकारी विश्रामगृहावर आले आणि बैठक झाली. मात्र, या बैठकीतून मनोमिलन होणे सोडाच, नाराज नगरसेवक व माजी आमदारांमधील ‘सोशल डिस्टन्स‘ही कमी करता आले नाही. उलट या नगरसेवकांवर अद्यापही आपलीच पकड असल्याचे दाखवून देण्यात आमदार लंके यशस्वी झाले.

वाचा:

पारनेरमधील शिवसेनेत समन्वय साधण्याची जबाबदारी कोरगावकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र, मुंबईहून आल्यानंतर ते पाच नगरसेवक विलगीकरणात होते. त्याची मुदत संपल्याने कोरगावकर आज पारनेरला आले. त्यांनी प्रथम माजी आमदार विजय औटी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नगरसेवकांची बैठक होणार होती. मात्र, ही बैठक कोठे घ्यायची यावरूनही मतभेद होते. ही बैठक पारनेरच्या सभापती निवास येथे घेण्याचे स्थानिक शिवसेनेचे नियोजन होते. मात्र, हे नगरसवेक तेथे येण्यास तयार नव्हते. शेवटी कोरेगावकर यांनी संपर्क केल्यावर लंके यांनी समन्वय साधून सरकारी विश्रामगृहावर बैठक घेण्याचे ठरले. मात्र, यात खूप वेळ गेला. तोपर्यंत कोरगावकर यांना नगरसेवकांची प्रतीक्षा करावी लागली. बैठकीच्या सुरुवातीला काही काळ लंकेही तेथे हजेरी लावून गेले. औटी मात्र या बैठकीला आले नाहीत. कोरेगावकर, नगर जिल्ह्यातील काही मोजके पदाधिकारी आणि ते नगरसेवक यांची बैठक झाली. ‘आम्ही उद्धव ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानून शिवसेनेत आलो आहोत, असे त्या पाच नगरसेवकांनी आज बैठकीत सांगितले. औटी यांच्यावर नाराजीच आहेच, शिवाय मुंबईहून परतल्यानंतर राजकीय द्वेषातून आपल्याला विलगीकरणात पाठविल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली.

वाचा:

या बैठकीनंतर ते नगरसेवक निघून गेले. कोरेगावकर पुन्हा सभापती निवास येथे आले. तेथे स्थानिक शिवसेनेचे पादधिकारी होते. मातोश्रीवर ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीची चुकीची माहिती येथे दिली जात असल्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. शिवसेनेत समन्वय ठेवण्याचे काम राष्ट्रवादीच्या आमदाराकडे कसे असू शकते, असा प्रश्न करून कोरेगावकर यांनी वस्तुस्थिती काय आहे, ते जाहीर करावे, अशी मागणी पदाधिकारी करीत होते. शेवटी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन उपक्रमांवर चर्चा होऊन बैठक संपविण्यात आली.

दरम्यान, औटी यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही. कोरेगावकर व औटी दोघांतच तासभर चर्चा झाली. बैठकीत काय चर्चा झाली ती अंतर्गत बाब असल्याचे सांगत औटी यांनीही यावर बोलण्यास नकार दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here