नारायण मूर्ती काय म्हणाले?
‘आम्हाला त्याचा अभिमान असून त्याला यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो’, असे इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. ब्रिटनमधील नागरिकांसाठी तो सर्वोत्तम काम करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इन्फोसिस आणि सुनक यांचं कनेक्शन
देशाबाहेरील उत्पन्नाच्या करावरून वादग्रस्त ठरलेल्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना इन्फोसिसमधील समभागांपोटी परतावा म्हणून १२६.६१ कोटींचा लाभांश मिळतो. अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या असून त्यांच्याकडे ३.८९ कोटी समभाग आहेत. त्याचे बाजारमूल्य ५,९५६ कोटी आहे.
इन्फोसिसने २०२१-२२ या आर्थिक वर्षात १६ रुपये प्रति समभाग लाभांश दिला होता. तर या महिन्यामध्ये १६.५ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आला. दोन्ही लाभांश मिळून अक्षता यांना प्रति समभाग ३२.५ रुपये किंवा एकूण १२६.६१ कोटी देण्यात आले. इन्फोसिस भारतातील सर्वोत्तम लाभांश देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. २०२१ मध्ये या कंपनीने प्रति समभाग ३० रुपये लाभांश दिला होता. त्यामुळे अक्षता यांना ११९.५ कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता.