दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आज असाच एक जनार्दन ड्रायव्हर नावाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना गोविंद बागेत भेटायला आला होता. त्याने त्याच्या सोबत एक बोर्ड आणला होता. ‘अजितदादा पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री,’ असं सदर फलकावर लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या औचित्याने गोविंद बागेत आणलेल्या याच फलकाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगत आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय या दिवशी प्रत्येकाला भेटतात. भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर प्रत्येकासोबत ते फोटोही काढतात. देशाच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणाऱ्या नेत्याला प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याची सुवर्णसंधी म्हणजे दिवाळीचा पाडवा. म्हणूनच मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक गोविंद बागेत येत असतात.
दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच शरद पवार, अजित पवार आणि कुटुंबातील इतर लोक भेटी-गाठी घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला पवारप्रेमीही भरभरुन प्रतिसाद देत असून यंदाही मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक भेटण्यासाठी गोविंद बागेत उपस्थित आहेत.
ईडी सरकारने शेतकऱ्यांनी त्वरीत मदत करावी, रुपाली पाटलांचा सरकारवर निशाणा