फटाकेमुक्त दिवाळीचा पॅटर्न

फटाके वाजल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही, अशीच धारणा सगळीकडे आहे, पण पाडळी गावच्या फटाकेमुक्त दिवाळीचा पॅटर्न महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सामाजिक संघटना, सरकारकडूनही वारंवार प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा, असं आवाहन केलं जातं. मात्र दर दिवाळीमध्ये या आवाहनाला सर्रास केराची टोपली दाखवली जाते, पण फटाक्यांशिवाय देखील दिवाळी साजरी करता येते, हे सांगलीच्या शिराळा तालुक्यातील एका छोट्याशा गावाने दाखवून दिलं आहे.
फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी

डोंगराच्या कुशीत वसलेल्या पाडळी गावाने २०१३ पासून फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पाडला आहे. गेल्या दहा वर्षांपासून पाडळी गावामध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची परंपरा जोपासण्यात येते. गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची बीजं रोवली गेली आहेत. त्यामुळे गावातली मुलं, तरुण हे प्रदूषण मुक्तीचा संदेश घेवून फटाक्यांशिवाय मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. फटाक्यांऐवजी दीपोत्सव साजरा करून दिवाळीतील प्रकाश द्विगुणित करत पर्यावरण वाचवण्याचा संदेश पाडळीकर ग्रामस्थ देतात.
गावात एकही फटाका उडवला गेला नाही

दिवाळी आली, की पाडळी गावामध्ये दीपोत्सवाची आणि किल्ल्यांची तयारी सुरू होते. तसंच रांगोळी आणि वेगवेगळ्या स्पर्धा या दिवाळीच्या निमित्ताने घेतल्या जातात. फटाक्यांच्या पैशाऐवजी पालक वृक्षारोपण किंवा इतर समाज उपयोगी गोष्टीसाठी खर्च करतात. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून पाडळी गावात एकही फटाका उडवला गेला नाही. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा पॅटर्न जोपासला जात असून ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे.
फटाकेमुक्त दिवाळी

एका छोट्याश्या गावाने प्रदूषण मुक्तीसाठी सुरू केलेली फटाकेमुक्त दिवाळीची ही चळवळ आजही तितक्याच जोमाने पाडळी ग्रामस्थ जोपासत आहे. याशिवाय आता ही चळवळ हळूहळू आसपासच्या गावात देखील रुजू लागली आहे. बाजूबाजूच्या इतर काही गावांनीही पाडळी गावाचा आदर्श घेऊन फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर दिला आहे. प्रदूषण मुक्तीसाठी खरंतर या छोट्याशा गावाने सुरू केलेली ही चळवळ वादळात दिवा लावण्यासारखीच ठरत आहे.
१०० टक्के फटाकेमुक्त गावाचा दावा

गाव फटाकेमुक्त करताना मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजवून सांगण्यात आले. फटाक्यांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी गावात अनेक स्पर्धा घेतल्या जातात. किल्ला बनवणं स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, झाडं लावणं, वक्तृत्व स्पर्धा, शाळेला सुट्टी असल्याने महिलांसाठी योगा शिबिरं दिवाळीच्या काळात घेतली जातात. सांगलीतील पाडळी गाव १०० टक्के फटाकेमुक्त झालं आहे. महाराष्ट्रातील पहिलंच असं फटाकेमुक्त गाव असल्याचा दावा पाडळीच्या सरपंचांनी केला आहे.