तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय अतिशय चुकीचा होता, असे बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले. त्यामुळे आता रवी राणा आणि नवनीत राणा दोघेही आक्रमक होण्याची शक्यता आहे. यामुळे हा वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. अशातच बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना १ नोव्हेंबरपर्यंताचा अल्टिमेटम दिला आहे.
आमदारांना पैसे दिले नाही, याची सत्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावी. याप्रकरणात थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन करून कारवाईची मागणी केली; पण उलट परत आरोप करण्यात आले, याकडेही आमदार कडू यांनी लक्ष वेधले.रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावेत आणि वस्तुस्थिती समोर आणावी; अन्यथा त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मी याबाबत प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याशिवाय, शिंदे गटातील अनेक आमदारांनी फोन करून आरोपांबाबत नाराजी व्यक्त केली आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले. त्यामुळे आता बच्चू कडू महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडवून आणणार का, हे पाहावे लागेल.
रवी राणांचा बोलविता धनी वेगळा, बच्चू कडूंचा रोख कुणाकडे?
२० वर्षे आम्ही लोकांमधून निवडून येतो तरीदेखील इतक्या खालच्या पातळीवर आम्हाला टीका सहन करावी लागते. रवी राणा एकट्याच्या जीवावर ही टीका करणार नाहीत. त्यांची तेवढी कुवत नाही. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे तपासणे गरजेचे आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी एका बैठकीबाबत गौप्यस्फोट केला. या बैठकीत बच्चू कडूला थंड करायचे ठरवले गेले. तो व्हिडिओ लवकरच माझ्याकडे येणार आहे. केंद्राची मदत घेऊन बच्चू कडूला अडचणीत आणण्याचे षडयंत्र रचले जात आहे. माझ्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे कडू यांनी सांगितले.