मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा आणि शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्यात सुरु असलेला वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कारण, बच्चू कडू यांनी या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून अद्याप याप्रकरणात भाष्य करण्यात आलेले नाही. तर दुसऱ्या बाजूला रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर बोचरी टीका करणे सुरूच ठेवले आहे. रवी राणा यांनी गुरुवारी रात्री एक ट्विट केला. या ट्विटमधून राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांनी नुकतीच नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी रवी राणा यांच्यावर आगपाखड केली होती. हाच धागा पकडत रवी राणा यांनी आपल्या ट्विटमधून बच्चू कडू यांना अप्रत्यक्षपणे डिवचले आहे. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे, असे रवी राणा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिवाळीनंतर बच्चू कडू आणि रवी राणा यांना समोरासमोर बसवून त्यांच्यातील वाद मिटवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अद्याप तशा कोणत्याही हालचाली घडताना दिसत नाहीत. याउलट शाब्दिक लढाईमुळे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखीनच विकोपाला जाताना दिसत आहे.

बच्चू कडूंचा फुटबॉल झालाय, शिंदे-फडणवीसांनी असं वागायला नव्हतं पाहिजे: सुषमा अंधारे

बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटात हालचाली

बच्चू कडू यांनी बुधवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.यानंतर शिंदे गटातील हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेत बच्चू कडू यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, केसरकर यांनी कडू (Bacchu Kadu) यांच्यावर आक्रमकपणे आरोप करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांच्याबाबत कोणतेही भाष्य करणे टाळले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बच्चू कडू यांची मनधरणी सुरु आहे की त्यांना अप्रत्यक्षपणे शांत बसण्याचा सल्ला दिला जातोय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दीपक केसरकर यांनी बच्चू कडू यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, असे संकेतही दिले आहेत.

बच्चू कडू हे जेष्ठ नेते असून, त्यांच्याबरोबर दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे. जे व्यक्ती मंत्री होणार आहेत, त्यांनी थोडा संयम ठेवायला हवा, अशी टिप्पणी केसरकर यांनी केला. राजकीय वर्तुळात केसरकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here