Agriculture News : राज्यात परतीच्या पावसानं शेतकी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातीआलेली पिकं या परतीच्या पावसानं हिरावून घेतली आहेत. मराठावडा आणि विदर्भाला या परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. त्यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात देखील परतीच्या पावसानं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळं जनशक्ती शेतकरी संघटना (Janshakti Shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी औरंगाबाद इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.
मदत न दिल्यास टाक्यावरुन उड्या मारु
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पिके ही पूर्णपणे वाया गेली आहेत. अशातच शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही. अद्याप नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत. दिवाळी जाऊनसुद्धा राज्य सरकारनं शेतकऱ्यांना काही मदत दिली नाही. त्यामुळंशेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवर चढून जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पालकमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळ शोले स्टाईलनं हे आंदोलन करण्यात आलं. मदत न दिल्यास पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे.