पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असून याचे लोन आता कॉलेजपर्यंत येऊन पोहोचले आहे. किरकोळ कारणातून पुण्यातील एका नामांकित कॉलेजसमोर विद्यार्थ्याला टोळल्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीरज सुनिल नांगरे (वय १७, रा. कात्रज) असं जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे असून विश्रामबाग पोलिसांनी ८ जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाजीराव रोडवरील नु. म. वि. कॉलेजसमोर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज सुटल्यावर एका टोळक्याने एकाला ओंकार पवार तूच का, असे विचारले तेव्हा नीरज नांगरे याने सदर विद्यार्थी हा ओंकार पवार नाही, असं उत्तर दिले. त्यानंतर मध्ये बोलणारा तू कोण? असं म्हणत कॉलेजमधील टोळक्याने नीरजला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. त्यात नीरजच्या डोक्याला खोलवर जखम होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्या कवटीपर्यंत मार लागून त्यात रक्तस्त्राव झाल्याचे सिटीस्कॅनमध्ये आढळून आलं आहे.

समाजाचा विरोध, कुटुंबाची साथ, आंबी गावात विधवांच्या हस्ते गृहप्रवेश, निवंगुणेंकडून नवा आदर्श

याप्रकरणी नीरज नांगरे याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. नीरज हा कात्रज येथे राहतो. तो नु. म. वि कॉलेजमध्ये १२ वी विज्ञान शाखेचा अभ्यास करत आहे. १९ ऑक्टोबर रोजी सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर तो मित्रांबरोबर कॉलेजच्या बाहेर आला. शालगर दुकानाजवळून जात असताना ३ मोटारसायकलवरुन ८ ते ९ मुले आली. त्यात वाणिज्य शाखेत शिकणारी कॉलेजमधील काही मुले होती. या टोळक्याने नीरजला हाताने मारण्यास सुरुवात केली. सोबतच्या मुलांनीही लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यातील एका मुलाने “आज याचा कार्यक्रमच करू” असं म्हणून रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा ब्लॉक दोन्ही हाताने उचलून पाठीमागून नीरजच्या डोक्यात जोरात मारला. त्यामुळे नीरज खाली कोसळला.

जखमी नीरजला त्याच्या मित्रांनी ससून रुग्णालयात नेले. तेथे त्याला रक्ताच्या दोन उलट्या झाल्या व तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी त्याचे सिटीस्कॅन केले. त्यामध्ये डोक्याच्या कवटीला मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाले असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तरीही तो बराच काळ बेशुद्ध होता. नुकताच तो थोडा शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निकुंभ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here