मुंबई: तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन दीड महिना उलटत नाही तोच आणखी एक टाटा-एअरबसच्या रुपाने राज्याने आणखी एक प्रकल्प हातातून घालवला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. पहिल्या दोन प्रकल्पांवेळी राजकीय वादंग निर्माण झाल्यामुळे टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यात तब्बल २२ हजार कोटीची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या तरुणवर्गाला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असता. त्यामुळे टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला जाणे, ही महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारतानं एअरबस सोबत सी-२९५ विमानांच्या निर्मितीसाठी २१ हजार कोटींचा सामंजस्य करार केला होता. या विमानांसाठी भारताने तब्बल २१,९३५ कोटी रुपये मोजले आहेत. भारतीय हवाई दलातील जुन्या झालेल्या AVRO-७४८ या विमानांची जागा सी-२९५ विमानं घेणार आहेत. एअरबस डिफेन्स अँड स्पेस (स्पेन) २०२३ पर्यंत भारतीय हवाईदलाला १६ विमाने तयार करुन देणार आहे. तर उर्वरित ४० विमानांची निर्मिती ही बडोदा येथील टाटा-एअरबस प्रकल्पात केली जाईल. बडोद्यातील कारखान्यात तयार होणारी ही विमान भारतीय हवाईदलातील सध्याच्या AVRO-७४७ या विमानांची जागा घेतील. हा प्रकल्प केवळ या ४० विमानांपुरताच मर्यादित नाही.
तीन प्रोजेक्ट हातचे गेले, म्हणून ‘या’ प्रकल्पासाठी धावाधाव, सामंतांनी भावाला मैदानात उतरवलं
भविष्यात गुजरातमधील टाटा-एअरबस प्रकल्पात भारतीय लष्कर आणि नागरी उड्डाणांसाठी लागणाऱ्या विमानांची निर्मिती केली जाईल. यापैकी काही विमानांची निर्यात करण्याचीही योजना आहे. त्यामुळे भविष्यात वडोदरा येथील हा प्रकल्प सी-२९५ प्रकारातील विमानांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी दिली. सी-२९५ ही विमाने भारतीय हवाईदलासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. ही विमाने ९ टनापर्यंतचे वजन वाहून नेऊ शकतात. एकावेळी या विमानातून ७१ जवान किंवा ४४ पॅराट्रुपर्स प्रवास करु शकतात. सी-२९५ हे विमान कमी जागेत टेक-ऑफ किंवा लँडिंग करु शकते. डोंगराळ भागातही हे विमान लँड करता येऊ शकते. बडोदा येथे होऊ घातलेला टाटा-एअरबस प्रकल्प हा तब्बल दशकभरापासून प्रलंबित होता.
महाराष्ट्राला दुसरा मोठा हादरा; रोहित पवार म्हणाले, ‘हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर…’

टाटा-एअरबस प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?

* ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बडोद्यात टाटा-एअरबस प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

* भारता एखाद्या खासगी कंपनीकडून लष्करी विमानांची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

* टाटा-एअरबस प्रकल्पात तयार होणाऱ्या ४० सी-२९५ विमानांमुळे भारतीय हवाईदलाची सामान ने-आण करण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.

* सी-२९५ या विमानांचा वापर मुख्यत्त्वेकरुन लष्करी जवान आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी होतो. ही नवीन विमानं भारतीय हवाईदलात १९६०च्या बनावटीच्या AVRO-७४८ विमानांची जागा घेतील.

* टाटा-एअरबस प्रकल्पामुळे गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here