पराग अग्रवाल यांनी टोमणा मारला
ट्विटरवरून बाहेर काढण्यात आलेला भारतीय वंशाचा पराग अग्रवालने सुरुवातीपासूनच मस्कच्या विरोधात आवाज उठवला आहे. मस्क यांनी ट्विटरसाठी बोली लावल्यापासून कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याशी वाद सुरु झाला होता. तर एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर पराग अग्रवाल यांनी अशी अनेक विधाने केली, ज्यामुळे दोघांमधील तणाव स्पष्टपणे उघडकीस आला. त्यानंतर पराग अग्रवाल यांनी कराराची घोषणा होताच टाऊन हॉलमध्ये कर्मचाऱ्यांना सांगितले की, “कंपनीचे भविष्य आता अंधारात आहे, मला माहित नाही की ते कोणत्या दिशेने जाईल.”
आधीच अंदाज बांधले जात होते
पराग अग्रवाल यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना ट्विटरमधून त्यांची सुट्टी होणार, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानंतर शुक्रवार २८ ऑक्टोबर २०२२ रोजी असेच घडले, शेवटी मस्कने ट्विटर डील पूर्ण केली आणि तो अॅक्शन मोडमध्ये येताच पराग अग्रवाल यांना प्रथम बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अग्रवालसोबत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) नेड सेगल यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. याशिवाय कायदेशीर धोरण, विश्वस्त आणि सुरक्षा विभागाच्या प्रमुख विजया गडदे यांनाही काढून टाकण्यात आले आहे.
एलॉन मस्क आणि ट्विटरचे माजी सीईओ अग्रवाल यांच्यातील लीक झालेल्या संभाषणांची मालिका मस्क आणि आता हकालपट्टी झालेल्या अग्रवाल यांच्यामधील नातेसंबंधाचे स्वरूप दर्शवते. ७ एप्रिल रोजी मस्क आणि अग्रवालचे “ट्विटरला अधिक चांगले बनवण्याच्या” एकमेकांच्या सूचनांना समजून घेण्याच्या प्रयत्नात पुढील दोन दिवसांतच विस्तूष्ट निर्माण झालं. ट्विटरच्या तांत्रिक तपशीलांवर आणि कोडबेसवर दोघांनी एकत्र कसे काम केले पाहिजे यावर दोघांचेही एकमत झाले. विशेष म्हणजे, मस्कने अग्रवाल यांना सांगितले की, मॅनेजमेंटचे काम करणे मला आवडत नाही. “मला वाटत नाही की कोणी कोणाचाही बॉस असावा. पण मला तांत्रिक/उत्पादन डिझाइन समस्या सोडवायला मदत करायला आवडते,” मस्कने अग्रवाल यांना लिहिले.
मात्र, मस्कने ट्विट केल्यानंतर दोघांमधील संबंध आणखी खराब होऊ लागले “यापैकी बहुतेक “टॉप” खाती क्वचितच ट्विट करतात आणि खूप कमी कंटेन्ट पोस्ट करतात. ट्विटर संपत आहे का?” ९ एप्रिल रोजी मस्क यांनी टॉप-१० सर्वाधिक फॉलो केलेल्या ट्विटर खात्यांच्या यादीसह पोस्ट केले. अग्रवाल स्पष्टपणे मस्कच्या ट्विटवर खूश नव्हते.
सीईओ वर्षभरही टिकले नाही
भारतीय वंशाचे पराग अग्रवाल गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये ट्विटरचे सीईओ बनले होते. अग्रवाल १० वर्षांपूर्वी सॉफ्टवेअर अभियंता म्हणून ट्विटरमध्ये रुजू झाले आणि २०१७ मध्ये कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बनले. यानंतर जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर पराग अग्रवाल यांची कंपनीच्या सीईओपदी वर्णी लागली, पण सीईओ बनताच मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली आणि वर्षभरातच पराग अग्रवाल यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले.