गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर, शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. एका बापाची अवलाद असेल तर रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावेत, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. यामधील ‘एका बापाची अवलाद’ हा शब्दप्रयोग बच्चू कडू यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण, याच वाक्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात अब्रनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी जर गुवाहाटीला जाऊन पैसे घेतले असतील तर ते कोणी दिले असतील? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलायला पाहिजे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही मंत्रीपदासाठी रांगेत उभे राहिले. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून तुम्ही बदनामी करायची, माझी लढाई शांततेची आहे. पण, जास्त अंगावर आली तर आरपारची लढाई लढू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता.
रवी राणांनी बच्चूभाऊंना पुन्हा डिवचलं
रवी राणा यांनी गुरुवारी एक ट्विट करुन बच्चू कडू यांना अप्रत्यक्षपणे डिवचले होते. दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे, असे रवी राणा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. या टीकेला बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिले होते. माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे १ तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. बॉम्ब कसा आहे हे १ तारखेला कळेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले.