मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौऱ्यातील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तूनही शेलक्या शब्दांत समाचार घेण्यात आला आहे.

‘राज्याचे कृषीमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू घेता का, दारू? असा प्रश्न करत आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच,’ अशा उपरोधिक शब्दांत ‘सामना’तून राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

सुप्रिया सुळेंचा घणाघात, ‘ईडी सरकार’मध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून जनतेची दिशाभूल’

मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदींनाही केलं लक्ष्य

राज्यातील स्थितीवरून सरकारवर टीका करत असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. ‘दिवाळीचा सण म्हणजे एक चैतन्य पर्वच असते. हे चैतन्य पर्व यावेळी अत्यंत जल्लोषात साजरे झाले. सर्व काही थाटामाटात, आनंद उत्साहात साजरे झाले. धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा वगैरे प्रत्येक दिवस मस्त झगमगाटात साजरा झाला. व्यापारी वर्गाचे चोपडा पूजन झाले. नरक चतुर्दशीस अनेक नरकासुर पायाखाली कचाकच चिरडून मारले गेले. भाऊबीजेचा थाटही यावेळी वेगळाच होता. गेल्या ७५ वर्षांत हा थाटमाट देशाने कधीच पाहिला नव्हता, पण हे सर्व घडू शकले ते दिल्लीत पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात श्री. मिंधे व फडणवीसांचे सरकार असल्यामुळेच. मुंबईच्या सराफा बाजारात कालच्या धनत्रयोदशीला साधारण १२०० कोटी रुपयांच्या सोने खरेदीचे व्यवहार झाले. मागील वर्षापेक्षा ही उलाढाल २५ टक्क्यांनी जास्त झाली. सामान्य लोक, कनिष्ठ मध्यमवर्गीय वगैरे ‘आनंदाचा शिधा’ सोडून एका उत्साहात फक्त सोने खरेदीसाठीच बाहेर पडले. सोन्या-चांदीच्या दुकानांत पाय ठेवायला जागाच नव्हती. रेशनच्या दुकानात गर्दी कमी, पण सोने-चांदी व इतर अलंकार खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीनिमित्त सर्वच सराफी दुकानांत जी गर्दी उसळली, लोकांनी जे भरभरून सोने खरेदी केले, त्याचे श्रेय फक्त पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रात मिंधे-फडणवीस यांच्या सरकारला जाते,’ असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

PM मोदींनी केलं आवाहन, ‘पोलिसांसाठी हवा एक देश, एक गणवेश’

‘सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय?’

राज्यात नवं सरकार आल्याने सकारात्मक बदल घडत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याचा समाचार घेताना शिवसेनेनं खोचक शब्दांत हल्लाबोल केला आहे. ‘जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच. ज्या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, ज्या ब्रिटिश साम्राज्याने आमच्यावर दीडशे वर्षे राज्य करून आम्हाला गुलाम करून ठेवले, त्या ब्रिटनवर आता एका भारतीय वंशाच्या तरुण पंतप्रधानांचे राज्य आले. ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. हे टपाल लंडनला पोहोचवून ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्ती केली गेली. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल. सुनक यांना पाठिंब्यासाठी लागणारे खासदार सुरत, गुवाहाटी, गोव्यात आणून ठेवले होते काय? याचा खुलासा झालेला नाही. शिवाय जे खासदार सुनक यांना पाठिंबा देणार नाहीत त्यांना येथील ‘ईडी’ने ‘टाइट’ केले काय? ते मिंधे महाशयच सांगू शकतील, पण सध्या राज्यात जे बरे घडते आहे ते फक्त तीन महिन्यांपूर्वी जो सामना मिंधे गटाने जिंकला त्यामुळेच,’ असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शिंदे-भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here